चिपळुणातील एन्रॉन पुलाचा मार्ग वाहतुकीस बंद

चिपळूण : चार वर्षांपूर्वी महापुरात खचलेल्या एन्रॉन पुलाच्या दुरुस्तीचे काम लांबले आहे. परिणामी हा मार्ग अजूनही वाहतुकीस बंदच आहे. त्यामुळे कामगार वर्गासह विद्यार्थ्यांचीही ऐन परीक्षेच्या कालावधीत गैरसोय होत आहे.

दुरुस्तीचे काम महिनाभर चालणार होते. मात्र, दोन महिन्यानंतर हे दुरुस्तीचे काम सुरूच ठेवले आहे. प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले दिसत असून तेथील यंत्रणादेखील अन्य ठिकाणी हलविण्यात आले आहे परंतु अजूनही हा मार्ग रस्त्यात भराव टाकून वाहतुकीस बंद ठेवल्याने वाहतुकदारांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

एन्रॉन पुलाचा एक पिलर २०२१ च्या महापुरात खचल्याने तो धोकादायक बनला होता. परिणामी या पुलावरून वाहतूक दोन वर्षे बंद करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीसाठी वर्षभरापूर्वी प्रयत्न केले. यावेळी आ. शेखर निकम यांनीही या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार सार्व, बांधकाम विभागाने या कामाची निविदा प्रक्रिया तातडीने राबवून देवरे अँड सन्स या कंपनीवर जबाबदारी सोपवली. पहिल्या टप्प्यात खचलेल्या ठिकाणचा स्लॅब उखडून आतील स्टील मोकळे केले.

जो पिलर खचला होता, त्या पिलरच्या बाजूने हायड्रोलिक जॅक लावून खचलेला स्लॅब दोन्ही बाजूने वर उचलण्यात आला. त्यामुळे आता खचलेला एन्रॉन पूल समपातळीत आला आहे.

पुढच्या टप्प्यात पुलावर डांबरीकरणाचे काम करून हलकी वाहने सोडण्यात आली होती. मात्र, अवजड वाहनांना या पुलावरून बंदी ठेवली होती. पुलावरील वाहतूक रोखण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूने लोखंडी पोलच्या सहाय्याने अटकाव केला होता. मात्र, पावसाळा सुरू होताच दुरुस्तीचे काम थांबवून यंत्रणा देखील हलविण्यात आली होती. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक देखील तात्पुरत्या स्वरूपात सुरू केली होती.

मात्र, पुन्हा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्यानंतर हा मार्ग वाहतूक बंद ठेवला. त्यासाठी रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. प्रत्यक्षात दुरुस्तीचे हे काम केवळ महिनाभर चालणार होते. आता दोन महिने होत आले तरी हे काम सुरूच आहे. त्यामुळे अवजड वाहनांसह अन्य वाहनांचीही ये-जा बंद राहणार आहे.

विद्यार्थ्यांची होणार गैरसोय
येत्या दोन दिवसांपासून शालेय वार्षिक परीक्षा सुरू होत असल्याने या मार्गावरून पेढे हायस्कूल, ख्रिस्त ज्योती हायस्कूलचे विद्यार्थी नियमित ये-जा करतात. मात्र, हा रस्ता वाहतुकीस बंद केल्याने ऐन परीक्षा कालावधीत या विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच लोटे येथील कामगार वर्गाचीही गैरसोय होणार असल्याने हा मार्ग तातडीने खुला करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 31/Mar/2025