सावर्डे : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज संचालित भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालय येथे ‘नेक्स्ट जनरेशन जीन सिक्वेन्स सिस्टम’ वापरून गुणसूत्रातील दोष निदान करता येणार आहेत. या अत्यंत उच्च दर्जाच्या अद्ययावत सुविधेचे उद्घाटन मुंबईतील प्रसिद्ध रोबोटिक जॉईंट रिल्सपमेन्ट ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सुधीर जोशी यांच्या हस्ते झाले.
डॉ. सुधीर जोशी हे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. यावेळी संस्थेचे प्रमुख विश्वस्त अशोक रघुनाथ जोशी, विकास वालावलकर, टाटा रुग्णालय मुंबईचे संचालक डॉ. श्रीपाद बाणावली, डॉ. सुनील नाडकर्णी, डॉ. आनंद जोशी, डॉ. ऋता मुल्हेरकर, डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. नेताजी पाटील यांसह ज्यांनी या नवीन प्रणालीचा फायदा कोकणातील जनतेला व्हावा याकरता कष्ट घेतले, ते जिनोमिक तज्ज्ञ शात्रज्ञ डॉ. नीलम शिरसाट उपस्थित होते.
भविष्यात वैद्यकीय उपचारांची दिशा ही पूर्णतः शरीरातील जनुकीय माहिती आणि त्यातील महत्त्वाचे बदल जे ठराविक आजाराला कारणीभूत आहेत यावर ठरणार आहे. प्रत्येक जीव हा डीएनए च्या साखळीत गुंफलेला असतो. त्याचा क्रम बदलला तर कर्करोगासारखे आजार निर्माण होतात.
अगदी याचेच निदान करण्यासाठी नेक्स्ट जनरेशन जीन सिक्वेन्स सिस्टम हे नवे तंत्रज्ञान वालावलकर रुग्णालयात स्थापित केले आहे. या नवीन पद्धतीवर प्रकाश टाकण्यासाठी रुग्णालयाने मधुमेही रुग्णाचे सर्वेक्षण सुरू केले आहे. या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोचावा याकरिता जागृती सुरू आहे.
प्रत्येक चाचणीसाठी खर्च कमी व्हावा याकरिता प्रयत्न सुरू आहेत. नेक सॅक १००० ही अमेरिकन कंपनी इलूमिना या कंपनीचे प्रॉडक्ट असून ही उच्च दर्जाची सुविधा वापरायला सोपी, जलद, उच्च दर्जाचे सीक्वेन्सिंग करणारी आहे. त्यात एन. आय. पी. टी, ट्रान्सक्रिप्टोम, एक्सऑम सिक्वेन्स आणि संगणकाद्वारे सेकंडरी अॅनालिसिसची सोय आहे. रमा पुरुषोत्तम फौंडेशन या सेवाभावी संस्थेने या यंत्रणेचा आर्थिक भार उचलला आहे. त्यांची तांत्रिक जबाबदारी आणि संशोधन हे जिनोमिक शास्त्रज्ञ नीलम शिरसाट करणार आहेत.
मधुमेही, कर्करोगग्रस्तांना वरदान
कर्करोगासाठी कोणत्या विशिष्ठ पेशीतील डीएनए बदल कारणीभूत आहेत आणि कोणते औषध लागू पडेल हे नेक्स्ट जनरेशन जीन सिक्वेन्स सिस्टममुळे आता अचूक समजेल. त्यामुळे कॅन्सरग्रस्ताचे आयुष्य वाढेल. तसेच जंतुसंसर्ग किंवा क्षय रोगाचे जंतू आणि त्याला मात देणारी औषधेही समजल्यामुळे उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाला त्याची मदत होईल. नवजात बालकातील जन्मजात दोष हे मातेच्या गर्भात बाळ असताना मातेच्या रक्तातून पहिल्या काही दिवसातच कळू शकणार आहेत. मधुमेहाला कारणीभूत डीएनए बदल आणि त्यानुसार योग्य उपचार शक्य होणार आहेत.
डीएनए हा ए. टी. जी. सी. या चार न्यूक्लिओटाईडच्या दुहेरी साखळीने बनलेला असतो. तो प्रत्येक पेशीच्या गर्भात स्थित असतो. प्रत्येक सजीवाची ब्लू प्रिंट ही चार न्यूक्लिओटाईडच्या क्रमावर ठरलेली असते. त्यामुळे जनुकीय दोष निदान करणे नेक्स्ट जनरेशन जीन सिक्वेन्स सिस्टमद्वारे शक्य आहे- सुवर्णा पाटील, संचालिका, डेरवण रुग्णालय
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 31/Mar/2025














