स्व. राजाराम शिंदे यांचे कार्य पुढे नेणार : आ. शेखर निकम

चिपळूण : मंदार एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, नाट्य मंदार आणि चित्र मंदारचे निर्मात माजी आमदार स्वर्गीय राजाराम शिंदे ऊर्फ आप्पा यांनी सामाजिक, राजकीय, नाट्य, शैक्षणिक क्षेत्रांत मोठे योगदान दिले आहे. विशेष म्हणजे पेढांबे येथे मंदार एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शैक्षणिकतेची दारे इथल्या मुलांना खुली करून दिली. कुठल्याही गोष्टी सहजासहजी मिळत नाहीत. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आप्पांचे कार्य मोठे असून, ते पुढे नेण्यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करू, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी शनिवारी येथे केले.

मंदार एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माजी आमदार स्व. राजाराम शिंदे यांच्या ९४ व्या जयंती कार्यक्रमात आ. निकम बोलत होते. आ. निकम म्हणाले की, माजी आमदार स्व. आप्पा आणि स्व. गोविंदरावजी निकम यांच्यात चांगले सबंध होते. राजकारणात मत-मतांतरे असली तरी हे दोघेही एकमेकांना आपापल्या कामात नेहमी मदत करीत असत. मुंबईसारख्या शहरात संस्था काढणे, ती चालविणे आणि पुढे ती वाढविणे हे सोपे काम नव्हते. पण आप्पांनी ते करून दाखवले. त्याप्रमाणे मंदार एज्युकेशन संस्थेची स्थापना करून आप्पांनी कोकणातील पहिले इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले. त्यामुळे इथल्या मुलांचे इंजिनिअर बनण्याचे स्वप्न साकार झाले.

यावेळी जि.प.चे माजी सभापती विनोद झगडे, माजी सभापती शौकत मुकादम, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कदम आदींनी यावेळी आठवणींना उजाळा दिला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या मंदार एज्युकेशन सोसायटीतील विद्यार्थ्यांचा उपस्थितांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याचबरोबर संस्था आवारात उभारण्यात येणाऱ्या स्व. राजाराम शिंदे यांच्या अर्ध पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाचे भूमीपूजन त्यांच्या नातवंडांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रमेश राणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील, अमित शिरगावकर, जयवंत शिंदे, श्रीकांत निगडे, नीलेश कदम, मिताली शिंदे, सुधाकर शिंदे आदींसह कर्मारी वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 07/Oct/2024

Radhakrushna patapedhi