बनावट हापूसच्या प्रश्नावर लोकसभेत चर्चा

रत्नागिरी : जीआय मानांकन मिळालेले असले तरीही बाजारात अन्य भागातील आंबे हापूस नावाने विकले जात आहेत. त्यामुळे हापूसच्या गुणवत्तेची ओळख नष्ट होईल. त्यासाठी कोकणाच्या बाहेरून येणाऱ्या आणि हापूस नावाने विकल्या जाणाऱ्यांवर दंड करण्यात यावा, अशी मागणी खासदार धैर्यशील पाटील यांनी लोकसभेच्या अधिवेशनात केली. त्यामुळे हापूसच्या नावावर होणाऱ्या विक्रीला शासनस्तरावरूनच आळा घालण्यासाठी पावले उचलली जातील अशी आशा कोकणातील आंबा बागायतदारांकडून व्यक्त होत आहे.

कोकण हापूस आंबा उत्पादक व उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेतर्फे हापूससंदर्भात खासदार पाटील यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली होती. याबाबत संसदेत माहिती देताना खासदार पाटील म्हणाले, कोकणात लागवड करण्यात आलेल्या हापूसची गुणवत्ता तेथील जमीन, पाणी आणि हवेतील विशिष्ठ परिस्थितीमुळे निर्माण झाली आहे. ही गुणवत्ता अन्य राज्यातील आंब्यांमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळेच संशोधनानंतर केंद्र शासनाचा अधिकृत संस्थेने प्रमाणित करून कोकणातील पाच जिल्ह्यात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या आंब्याला हापूस नावाने जीआय मानांकन देण्यात आले आहे. त्याची अधिकृत नोंदही झाली आहे. त्यामुळे अन्य आंब्याला हापूस नाव देता येणार नाही. जीआय मानांकनामुळे हापूसची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारात वेगळी ओळख राहणार आहे.

खासदार पाटील यांनी हापूस उत्पादकांची व्यथा चांगल्याप्रकारे मांडली आहे. काकणातील १९४५ शेतकयांनी हापूस जी. आय नोंदणी केली आहे. आज देशामध्ये जी. आय. मानांकन वापरकर्त्यांमध्ये हापूसचा प्रथम क्रमांक लागतो, जीआय घेतलेल्यांना संस्थेने क्युआर कोडही प्रकाशित केला आहे. या कोडचा वापर प्रत्येक फळावर, लाकडी पेटीवर व कोरोगेटेड बॉक्सवर केला तर हापूसची अस्सल ओळख देशभर पक्की होईल आणि हापूसच्या नावाने इतर आंब्याच्या भेसळीला पायबंद बसेल- डॉ. विवेक भिडे, अध्यक्ष, कोकण हापूस आंबा उत्पादक व उत्पादक विक्रेते सहकारी संघ

तिप्पट हापूस आंबा विक्रीला
गेल्या काही वर्षात कोकणात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या आंब्यापेक्षा तिप्पट हापूस आंबा विक्रीला येतो. तीन आंब्यामध्ये दोन बनावट आंबे हापूसच्या नावाने विकले जात असल्याचे पुढे आले आहे. कोकणाच्या बाहेरून येणाऱ्या आणि हापूस नावाने आंबा विकणाऱ्यांवर दंड करण्यात यावा. तरच हापूस टिकाव धरेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 07/Apr/2025