रत्नागिरी : ग्रामीण भागात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता महाराजस्व शिबीर

रत्नागिरी : महसूल विभागाचा कारभार अधिक लोकाभिमुक होणार आहे. महसूल विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्न त्वरित सोडवण्यात येणार आहेत. जनतेच्या तक्रारी निकालात काढून महसूल विभाग कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी शासनाने मंडल स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन केले आहे. वर्षाला अशा ४ शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे.

प्रत्येक शिबिराला २५ हजार अशा प्रकारे वर्षाला १ लाख खर्चाची मर्यादा या शिबीरांसाठी घालून देण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजना आणि महसूल विभागाअंतर्गत मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबवण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. शिबिराचे आयोजन व त्यासाठी येणारा खर्च गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेतंर्गत सातवा घटक म्हणून २०२५-२६ या आर्थिक वर्षापुरता समाविष्ट करण्यात येणार आहे.

प्रत्येक जिल्हयास मिळणाऱ्या नियतव्ययाच्या प्रमाणात कोणताही बदल न करता महसूली क्षेत्रीय कार्यालयाकडून जनतेस सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान मंडळ स्तरावर आयोजित केले आहे. प्रत्येक जिल्हयातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर वर्षातून किमान ४ वेळा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्यात येणार आहे.

यामध्ये ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड वाटप, सामाजिक लाभाच्या योजना जसे, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना आदी महसूल विभागाशी संबंधीत विविध प्रमाणपत्रांचे वाटप, प्रमाणपत्राबाबत जनतेच्या तक्रारी त्वरित निकालात काढण्यात येणार आहेत.

या शिबिरामध्ये संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, यांनी शिबिराच्या आयोजनासाठी आराखडा तयार करुन कार्यक्रमांची अमंलबजावणी चोखपणे पार पाडावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे. प्रत्येक मंडळ स्तरावर आयोजित शिविराचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करायचा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:02 PM 12/Apr/2025