दापोली : देवीच्या मूर्तीत ‘सत्व’ आणायला लाखाची बिदागी, बोकड, कोंबड्याची मागणी

दापोली : तालुक्यातील एका गावात देवीच्या मूर्तीतील कथित चोरून नेलेले ‘सत्व’ परत आणून मूर्तीत प्रस्थापित करण्याच्या नावाखाली एका भगताने एक लाख रुपये, एक बोकड आणि अकरा कोंबड्यांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दापोली पोलिसांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे अंधश्रद्धा पसरवणारा हा डाव फसला. या प्रकाराची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांनी भगताला खाक्या दाखविला.

तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या एका गावात काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चुन देवीचे मंदिर बांधले होते; परंतु काही महिन्यांतच मंदिराच्या भिंतींना तडे गेले. ग्रामस्थांनी देवीला कळे लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. दरम्यान, गावातील एका ग्रामस्थाच्या वागणुकीबाबत इतरांना संशय आला. त्याच्या पूर्वजांनी देवीच्या मूर्तीमधील ‘सत्व’ काढून घरी नेल्याची माहिती मिळाल्याने गावात खळबळ उडाली. गावकऱ्यांनी संबंधित ग्रामस्थावर दबाव आणून देवीचे पुन्हा मंदिरात आणून प्रस्थापित करण्यास ‘सत्व’ मूर्तीत सांगितले. यावर त्या ग्रामस्थाने गावाबाहेरील एका भगताशी संपर्क साधला. या भगताने हे काम करण्यासाठी १ लाख रुपये बिदागी, एक बोकड, ११ कोंबड्या आणि इतर पूजा साहित्याची मागणी केली. संबंधित ग्रामस्थानी ही मागणी मान्य करून विधीचा दिवसही निश्चित केला होता.

मात्र, या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रकाराची कुणकुण दापोली पोलिसांना लागताच घटनास्थळी धाव घेऊन हा प्रकार उधळून लावला. पोलिसांनी संबंधित ग्रामस्थ आणि भगतासह सर्वांना ठाण्यात बोलावून घेतले. अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणारे कृत्य न करण्याबाबत पोलिसांनी सक्त ताकीद दिली. यावेळी भगताने चूक कबूल केली आणि भविष्यात असे कृत्य करणार नसल्याचे आश्वासन दिले.

संबंधित गावात अशा प्रकारची पूजा होणार असल्याचे कळताच पोलिसांचे पथक पाठवून पडताळणी केली. मात्र, तेथे आम्हाला काहीच सापडले नाही. परंतु, हा प्रकार घडणार होता याची माहिती मिळाली होती. संबंधितांना बोलावून समज दिली आहे आणि असे जर पुन्हा काही घडले तर गुन्हा दाखल केला जाईल-विवेक अहिरे, पोलिस निरीक्षक, दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 14/Apr/2025