रत्नागिरी : जिंदल गॅस टर्मिनल स्थलांतरासाठी धरणे आंदोलन सुरू

रत्नागिरी : जिंदल गॅस टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतरित व्हावे, या मागणीसाठी नांदिवडे प्रदूषणविरोधी कृती समितीने सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून त्यांनी हे आंदोलन केले.

जिंदल कंपनीच्या माध्यमातून १२ डिसेंबर २०२४ ला वायू गळतीमुळे परिसरातील शेकडो विद्यार्थी बाधित झाले. या संदर्भातील कंपनी प्रशासनाच्या विरोधातील लेखी तक्रार तहसीलदारांनी जयगड पोलिसांत दिली. अजूनही अनेक विद्यार्थ्यांना त्या घटनेचा त्रास होत आहे. इतकेच नाही तर जिंदल कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे आज परिसरात मोठ्या प्रमाणात स्थानिक जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. येथील बागायती, पिण्याचे पाणी, आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आहेत; मात्र हव्यासापोटी कंपनी, प्रशासन ज्या गॅस वायूगळतीमुळे त्रास झाला तो गॅस साठवणूक करण्यासाठी नांदिवडे – अंबुवाडी फाट्यावर लोकवस्तीमध्ये गॅस टर्मिनल उभारित आहे. हे टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतरित व्हावे, या मागणीसाठी सोमवारपासून नांदिवडे प्रदूषणविरोधी कृती समितीने आंदोलन सुरू केले आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष शंकर तुकाराम घाणेकर यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 15-04-2025