लांजा : लोकांना कोणत्याही प्रकारची माहिती न देताच लांजा शहर विकास आराखडा (डिपी प्लॅन) बळजबरीने नागरिकांवर लादण्याचा प्रयत्न नगरपंचायत प्रशासनाने करू नये. नागरिकांच्या शंकांचे निरसन करा आणि मगच विकास आराखडा मंजूर करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने नगरपंचायतीकडे केली आहे.
नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांना कोणतीही माहिती न देताच शहराचा प्रारूप विकास योजना आराखडा (डीपी प्लॅन) जाहीर केला आहे. त्यामुळे या प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नगरपंचायत प्रशासनाला निवेदन दिले आहे. शहर विकास आराखड्याबाबत नागरिकांना किंवा भूधारक शेतकरी यांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.
हे सर्वजण या विकास आराखड्याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे एकप्रकारे तो बळजबरीने पूर्ण करण्याचा किंवा तो ग्रामस्थांवर लादण्याचा नगरपंचायतीचा हेतू असल्याचे दिसून येते.
लांज्याचा विचार केला तर लांजा नगरपंचायतीचा संपूर्ण भाग हा वाडी वस्ती, शेती, व्यवसाय यात विभागला आहे. आराखडा पाहता ग्रामस्थांचे वैयक्तिक तसेच शेतीबाबत, घरांबाबत आणि व्यवसायांबाबत मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्हे आहेत. या विकास आराखड्याबाबत घंटागाडीच्या माध्यमातून लोकांना माहिती देऊन ग्रामस्थांची सभा घेण्यात यावी आणि या ठिकाणी ग्रामस्थांना संपूर्ण माहिती देण्याची आवश्यकता आहे.
त्यामुळे शहर विकास आराखड्याला विरोध असून ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करा आणि त्यानंतरच विकास आराखडा मंजूर करा. अन्यथा हा आराखडा मंजूर करू नये, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मोहन तोडकरी, मंगेश मुळ्ये, सचिन लिंगायत, रवींद्र लिंगायत, नितीन शेट्ये, सूर्यकांत लांजेकर, चंद्रशेखर धावणे, सुरेश कांबळे आदींनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 15/Apr/2025














