रत्नागिरी : गावातील विविध प्रश्नांकडे यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने आत्मदहनाचा इशारा दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यासह सहकाऱ्यांची आज भेट घेतली. ११ वाजता सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने आत्मदहनाचा इशारा मागे घेतला.
चिपळूण तालुक्यातील टेरव गावाच्या पाणी, रस्ते, शिक्षण आदी कामे करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आला. शासनाने विविध विकास योजना मंजूर केल्या, शासनाकडून निर्णय झाले; परंतु निधी न आल्यामुळे सर्व कामे अपूर्ण राहिली आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील अधिकारी वर्गाने वेळेत शासनाकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा न केल्याने कामे प्रलंबित राहिल्याने संबंधितांची खातेनिहाय चौकशी करण्याच्या मागणीसाठी सरपंच किशोर कदम यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
यापूर्वी देखील प्रशासनाला त्यांनी निवेदन दिले होते. सरपंच किशोर कदम यांच्या म्हणण्यानुसार, थेट जनतेतून सरपंच म्हणून ग्रामंचायत टेरवमधून निवडून आले. गावाचे विविध प्रश्न पाणी, रस्ते, शिक्षण इत्यादी कामे करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम व रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे तसेच रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी टेरव गावाच्या विकासासाठी सहकार्य केले.
गावातील विकासकामांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संदर्भात शासनाने समिती गठित करून शासननिर्णय झालेला आहे; परंतु गेली दोन वर्षे जिल्हाधिकारी यांनी या निमित्त बैठकीचे आयोजन केलेले नाही, याला जबाबदार कोण? असा सवाल सरपंच कदम यांनी केला होता. जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी योजना टेरव व टेरव बु. तसेच टेरव वेतकोंड स्वतंत्र नळपाणी योजना करणे याबाबत गावाला दोन वर्ष न्याय मिळालेला नाही. महसूल विभाग योग्य ती कार्यवाही व मार्गदर्शन का करत नाही? सौरलाईट प्रस्ताव अपूर्ण राहिल्यामुळे गावामध्ये योजना मंजूर होऊन सुद्धा विद्युत विभागामार्फत त्याचा ग्रामस्थांना लाभ का मिळत नाही? तरी आपल्या स्तरावर या संदर्भात संबंधित विभागाला अधीक्षक रत्नागिरी विद्युत विभाग यांना आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर आज टेरव गावातील विकासकामांसंदर्भात सरपंच किशोर कदम व त्यांच्या सहकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची भेट घेतली. त्यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे देखील उपस्थित होते. या संदर्भात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलावण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचे सरपंच कदम यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 15/Apr/2025














