रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशन आयोजित क्रिकेट स्पर्धेत नेने वॉरियर्स विजेते

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील विविध न्यायालयांतील कर्मचारी, वकील आणि वकिलांचे कारकून अशा ११ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे विजेतेपद नेने वॉरियर्स संघाने पटकावले. खेड कोर्ट संघाला उपविजेतेपद मिळाले.

स्पर्धेचे उ‌द्घाटन रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, रत्नागिरीचे मुख्य न्याय दंडाधिकारी एन. जी. गोसावी, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) बी. डी. तारे, सकपाळ व दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) महाडिक उपस्थित होते.

प्रमुख पाहणे प्रमुख न्यायाधीश गोसावी यांनी न्यायालयीन कर्मचारी व वकिलांमध्ये सुसंवाद आणि संघभावना वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धाचे महत्त्व अधोरेखित केले. उ‌द्घाटनप्रसंगी अॅड. विलास पाटणे यांनी क्रीडा स्पर्धांमधून सामाजिक समरसता व एकता कशी जपता येते, यावर आपले विचार मांडले.

स्पर्धेतील सामने अटीतटीचे आणि रंगतदार झाले. अंतिम सामना खेड कोर्ट विरुद्ध नेने वॉरियर्स संघामध्ये खेळवण्यात आला. हा थरारक सामना नेने वॉरियर्स संघाने जिंकत विजेतेपद आपल्या नावे केले. अंतिम सामन्यात सुमित नागवेकरला सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज म्हणून रत्नदीप चाचले यांना, तर मालिकावीर म्हणून राजापूर कोर्टातील बनसोडे यांना पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रत्नदीप कांबळे, कौस्तुभ गानू, शुभांकन दळी यांनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेला पंच म्हणून विनय गोवेकर आणि मोरे यांचे मोलाचे योगदान लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 16/Apr/2025