रत्नागिरी : केळ्ये येथील शां. य. गोडबोले विद्यामंदिरच्या रौप्य महोत्सवी वर्षाला प्रारंभ

रत्नागिरी : केळ्ये येथील शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यालयात आसपासच्या गावातील विद्यार्थी येतील, यासाठी चांगले प्रशिक्षण देऊया. शाळा चांगली व्हावी याकरिता ग्रामस्थ, शिक्षक काम करत आहेत. आता पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना येण्याकरिता गाडीची सुविधा देण्याची तयारी मार्गदर्शक एस. जी. घरत यांनी केली आहे. शाळेच्या रौप्य महोत्सव सुरू झालाय, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांनी केले.

केळ्ये येथील गोडबोले विद्यामंदिरच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी कार्यवाह सतीश शेवडे यांनी कमी होणारी विद्यार्थी संख्या व त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक पद कमी होत असल्याची समस्या सर्वच शाळांना भेडसावत असल्याचे सांगितले. इथला शिक्षकांचा संच तसाच राहील, अशी ग्वाही दिली व शाळेला मिळणाऱ्या देणग्यांचा पैसा या शाळेसाठीच वापरले जातील, असे स्पष्ट केले.

सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी प्रास्ताविकामध्ये शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमाला सरपंच सौ. सौरभी पाचकुडवे, एस. वाय. गोडबोले यांचे कुटुंबीय विकास गोडबोले, जयकुमार गोडबोले, कैलास चव्हाण, र. ए. सोसायटीचे महेश नवेले, काशिनाथ बापट, शेखर बापट, सुहास सहस्त्रबुद्धे, पड्यार गुरुजी, माजी सरपंच गजानन नाखरेकर, गीतांजली दातार, श्रीराम केळकर आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापिका सौ. स्नेहा पाटील यांनी शाळेच्या स्थापनेपासूनचा २५ वर्षांचा थोडक्यात आढावा घेतला. (कै.) अरुअप्पा जोशी, (कै.) जे. व्ही. हळबे, प्राचार्य (कै.) डॉ. सुभाष देव, बबनराव पटवर्धन यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे ही शाळा उभी राहिल्याचे सांगितले. शाळेने साने गुरुजी गुणवत्ता अभियानात सलग तीन वेळा प्रथम क्रमांक मिळवला आहे. विभागीय क्रीडा स्पर्धेतही शाळेने यश मिळवले आहे. आजपर्यंत या शाळेतून ९०० विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले असून चांगल्या ठिकाणी नोकरी, व्यवसाय करत आहेत. रौप्य महोत्सवानिमित्त स्मरणिका, माजी विद्यार्थी मेळावा, ग्रामस्थ महिला मेळावा, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन मेळावे यांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Khabardar diwali fest

जयकुमार गोडबोले म्हणाले की, ही शाळा कधीही बंद पडता कामा नये, अशी भूमिका संस्थेने घ्यावी. विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी आसपासच्या गावातील मुले आली पाहिजेत. संगणक लॅब पूर्ववत करून विद्यार्थ्यांना अद्ययावत संगणक शिक्षण मिळावे, यासाठी संस्थेने प्रयत्न करावेत.

माजी विद्यार्थी व कोतवडेचे मंडल अधिकारी अमोल पड्यार यांनी शाळेबद्दल ऋण व्यक्त केले. रामचंद्र केळकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन सौ. श्रुती रहाटे यांनी केले. सौ. अनघा रसाळ यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:22 08-10-2024