रत्नागिरी : एसटीने थकवले इंधनाचे 5 कोटी

रत्नागिरी : ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली लालपरी सध्या अनेक संकटात सापडली आहे. एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला महिन्याला १ कोटीचा तोटा सहन करावा लागत आहे. रत्नागिरी एसटी विभागाची ९५० चालक, वाहकांची गरज असून ती पदे अद्यापही भरली नाहीत. विभागाला १५० बसेसची आवश्यकता आहे. त्याही मिळालेल्या नाहीत. डिझेल पुरवठा करणाऱ्या दोन ऑईल कंपन्यांचे ५ कोटी रुपये थकीत आहेत.

ग्रमीण भागातील सर्वसामान्य प्रवाशांना एसटीचाच मोठा आधार असतो. घरादारांपर्यंत एसटी जोडली असल्याने एसटीशी जिव्हाळ्याचे नाते आहे; मात्र सध्या नागरिकांच्या मागणीप्रमाणे सेवा देता येत नसल्याचे स्पष्ट होत आहे. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे बस उपलब्ध होत नाहीत तसेच चालक, वाहक यांची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत आहे. जिल्ह्यात २ हजार ३६३ चालक, वाहक कार्यरत आहेत, तर साधारण ९५० पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम एसटी सेवेवर होत आहे. जिल्ह्याचा विचार करता अजून ९५० चालक, वाहकांची गरज आहे; परंतु ही पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम फेऱ्यांवर होऊन प्रवाशांची गैरसोय होत आहे.

रत्नागिरी विभागात रोज ३ हजार ८३५ फेऱ्या असतात. त्यासाठी ३६० बस उपलब्ध आहेत; परंतु अजून विभागात १२० ते १५० बसची कमतरता भासत आहे. रत्नागिरी एसटी विभागात रोज ४५ ते ५० लाख रुपयांचे डिझेल लागते. डिझेल पुरवठा करणाऱ्या दोन कंपन्यांची ५ कोटी रुपयांची थकबाकी आहे तसेच सेवानिवृत्तीनंतर रजारोखीकरणाची मे २०२३ पासून सुमारे ४ कोटी ६२ लाखइतकी थकबाकी देय आहे. यावरूनच रत्नागिरीतील एसटी महामंडळ आर्थिक संकटात असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 17/Apr/2025