दापोली : कोकणात ग्रामीण भागात फिरून काजू बी वजनमापात फेरफार करून किलोमागे जास्ती पैसे देण्याचे आमिष दाखवत विकत घेऊन फसवणूक करणाऱ्या परप्रांतीय टोळक्याला शिवसेना स्टाईलने हिसका दाखवला. हा प्रकार दापोलीत गुरुवारी सकाळी घडला. याप्रकरणी तेरा जणांना शिवसेना कार्यकर्त्यांनी दापोली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकारामुळे काजू बी खरेदी करताना वजनमापात पाप करणाऱ्यांवर अंकुश बसणार आहे.
दापोली तालुक्यातील ग्रामीण भागात पहाटेला शेतकऱ्यांकडे जाऊन हे टोळके काजू बिया विकत घेत असल्याची माहिती पंधरा दिवसांपूर्वी मिळाली होती. त्याप्रमाणे पाळत ठेवून गुरुवारी हा सगळा प्रकार शिवसेनेच्या युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर आणला.
या कारवाईबाबत माहिती देताना प्रसाद ऊर्फ पप्पू रेळेकर म्हणाले, “सुमारे ३० ते ४० गाड्या पहाटेच्या सुमारास ग्रामीण भागात काजू बी खरेदी नियमित जात असल्याची माहिती मिळाली होती. दापोली-दाभोळ आणि दापोली-मंडणगड मार्गावर शिवसेनेचे युवा पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी संशयित परप्रांतीय टोळक्यांवर पाळत ठेवली होती. त्यातील काही टेंपो दिसले. त्यांना थांबवून त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक काटे आणि हातातील काटे तपासले. प्रत्यक्षात ३५ किलो असलेल्या काजू बी त्यात २६ किलोच भरत असल्याचे निदर्शनास आले. तसेच बाजारात १४० रुपये किलोचा भाव असताना हे परप्रांतीय वजनात फेरफार करून १८० रुपयांचा दर देत होते.
त्या संशयितांकडील इलेक्ट्रिक काटे परराज्यातून आणण्यात आल्याची माहिती पुढे आली. त्यातील इलेक्ट्रॉनिक काटे हे रिमोटवरती थेट ऑपरेट केले जातात अशीही माहिती त्यांच्याकडून समजली. सध्या काजू बीचा दर पाहता परप्रांतीय लोकांचे टोळके ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे दिसते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात शिवसैनिकांनी मोहीम हाती घेतली आहे. त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 18/Apr/2025














