गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे; मात्र गुहागर तालुका हा टंचाईमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. एप्रिलचा निम्मा महिना संपला तरी तालुक्यातील एकाही गावातून टँकरची मागणी आलेली नाही. त्यामुळे गुहागरमधील प्रशासन यंत्रणा शांत आहे.
सध्या चिपळूण, खेड, मंडणगड, देवरूखसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पाणीटंचाई आहे. तेथील ग्रामपंचायतीने तहसील विभागाकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे; मात्र गुहागर तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीने अजून तशी मागणी पंचायत समिती किंवा तहसील विभागाकडे केलेले नाही.
डोंगराळ भागात राहणाऱ्या धनगरवाड्यामध्ये नेहमी पाणीटंचाई जाणवते. गुहागर तालुक्यातील डोंगराळ भागात धनगरवाड्या आहेत; मात्र तेथेही पाणीयोजना पोचल्याने गुहागर तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे.
गेल्या वर्षी गुहागर तालुक्यात पाणीटंचाई होती. साखरीत्रिशूळ, धोपावे आणि सडेजांभारी या तीन गावांतून टँकरची मागणी झाली. त्यांना महसूल विभाग आणि आरजीपीपीएल कंपनीकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. यावर्षी त्या गावातून टँकरची मागणी आलेली नाही.
आमदार भास्कर जाधव यांनी मागील पंधरा वर्षात गुहागर तालुक्यातील टंचाई निवारणासाठी प्रयत्न केले. त्याचे फलित म्हणून तालुक्यात अजूनही टंचाई जाणवलेले नाही, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गुहागर तालुक्यात एकूण ११९ गावे आणि ६६ ग्रामपंचायती आहेत.
तालुक्यातील टंचाई निवारणासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत एकूण ११२ नळपाणी योजना राबवल्या जात आहेत. यातील २६ गावांच्या पाणीयोजना पूर्ण झाल्या आहेत. त्यातून गावांना पाणीपुरवठा होत आहे. सहा पाणीयोजनांचे काम अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित योजनांचे काम सुरू आहे. तालुक्यातील मुंढर, खोडदे, पालीसह काही गावांमध्ये ग्रॅव्हिटीच्या पाणीयोजना आहेत. या योजनांवर गावच्या पाण्याची तहान भागवली जाते.
गुहागरमधील नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी मी मागील पंधरा वर्षे संघर्ष केला आणि नियोजनपूर्वक कामही केले. त्यामुळे केवळ गुहागरच नव्हे तर माझ्या मतदारसंघात येणाऱ्या खेड तालुक्यातील गावांमध्येही अजून पाणीटंचाई जाणवलेली नाही. दोन दिवसांपूर्वी मी मतदारसंघातील टंचाईचा आढावा घेतला. कोणत्याही गावातून टँकरची मागणी झालेली नाही – भास्कर जाधव, आमदार गुहागर
तालुक्यात गेल्या वर्षी तीन गावांमध्ये पाणीटंचाई होती. यावर्षी अजून टँकरच्या मागणीचे पत्र आलेला नाही. सध्यातरी कोणत्याही गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही- परिक्षित पाटील, तहसीलदार गुहागर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 18/Apr/2025














