अॅड. विलास पाटणे लिखित ‘न्यायिक धैर्याचा दीपस्तंभ’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

रत्नागिरी : न्यायिक धैर्याचा दीपस्तंभ म्हणून सुप्रसिद्ध न्यायमूर्ती एच. आर. खन्ना यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी (ता. १९) होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या हस्ते व अन्य न्यायमूर्तीच्या हस्ते याचे प्रकाशन होणार असल्याची माहिती या पुस्तकाचे लेखक अॅड. विलास पाटणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमासाठी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती माधव जामदार, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष अॅड. सुदीप पासबोला, रत्नागिरीचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता माळनाका येथील हॉटेल विवेक बँक्वेट हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे. अॅड. पाटणे यांचे हे नववे पुस्तक आहे. तसेच न्यायमूर्ती खन्ना यांच्यावरील पहिलेच मराठी पुस्तक आहे.

रामशास्त्रींवरील चरित्र ग्रंथानंतर आता पद्मविभूषण न्यायमूर्ती खन्ना यांच्यावर चरित्रात्मक लेखन केले आहे. न्यायमूर्ती खन्ना यांनी केशवानंद भारती व शिवकांत शुक्ला या खटल्यात लिहिलेली निकालपत्रे ऐतिहासिक आहेत. या खटल्यातील बहुमताच्या निकालाप्रमाणे असे जाहीर करण्यात आले की, विधी मंडळाला घटना दुरुस्तीचा अधिकार आहे; पण घटनेचा गाभा बदलण्याचा अधिकार नाही. हे असे निकालपत्र आहे की, ज्यामुळे भारतातील लोकशाही टिकली. यामुळेच भारताचे नागरिक न्यायसंस्थेचे ऋणी राहतील.

शिवकांत शुल्का खटल्यात न्यायमूर्ती खन्ना यांचे निकालपत्र हे अल्पमतातील निकालपत्र होते. आणीबाणीमुळे जरी घटनेने दिलेले मूलभूत हक्क हिरावून घेतले तरी स्वातंत्र्याचे नैसर्गिक हक्क अबाधित राहतात हे त्यांचे निकालपत्र क्रांतिकारी ठरले. या निकालपत्रामुळे भारताच्या मुख्य न्यायमूर्ती पदाला खन्ना यांना मुकावे लागले होते. पत्रकार परिषदेला ज्येष्ठ वकील अॅड. कदम, अॅड. नेने, अॅड. राजशेखर मलुष्टे, अॅड. अनिरूद्ध फणसेकर, अॅड. रत्नदीप चाचले, अॅड. नलावडे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 18/Apr/2025