राजापूर : राजापूर तालुका खरेदी-विक्री संघाच्यावतीने यावर्षी शासकीय दराने करण्यात आलेल्या भातखरेदीमध्ये ४७ शेतकऱ्यांनी १ हजार १६८ क्विंटल भातविक्री केली. त्यातून २६ लाख ८८ हजार २४० रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.
शेतामध्ये पिकणारे भात शासनाकडून खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकणाऱ्या भातातून उत्पन्न मिळत आहे. मात्र, यावर्षी आधी अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस, कीडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे भातशेतीचे नुकसान झाले. त्यातून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून गेले. या स्थितीमध्ये भातखरेदीच्या दरामध्ये झालेली वाढ शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. याचा फायदा उचलत अनेक शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून भातविक्री केली. राजापूर खरेदी-विक्री संघाच्या पाचल आणि राजापूर येथील केंद्रावर भातखरेदी करण्यात आली. त्यामध्ये राजापूर येथे २९ शेतकऱ्यांकडून ६४६ क्विंटल, तर पाचल येथे १८ शेतकऱ्यांकडून ५२२.८० क्विंटल असे मिळून १ हजार १६८.८० क्विंटल भाताचा समावेश आहे. त्यामुळे २६ लाख ८८ हजार २४० रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत विक्रीत घट
गतवर्षी खरेदी-विक्री संघाच्या भातखरेदी केंद्रावर २ हजार ६४५ क्विंटल भातखरेदी झाली होती. यावर्षी ती निम्म्यावर आल्याने भातशेती करणाऱ्यांची संख्या वर्षागणिक कमी होत असल्याचे चित्र अधोरेखित होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 18/Apr/2025














