रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला सरत्या आर्थिक वर्षामध्ये ९४.६४ कोटी रुपयांचा ऐतिहासिक ढोबळ नफा झाला आहे.
बॅंकेच्या ठेवी २८६६.८७ कोटी रुपये, कर्जव्यवहार २१९९.६३ कोटी असा ५०६६.५१ कोटी एकूण व्यवसाय झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बॅंकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात आज दुपारी पत्रकार परिषदेत डॉ. चोरगे यांनी बॅंकेचा लेखाजोखा सादर केला. बॅंकेचे कार्यक्षेत्र रत्नागिरी जिल्हा असून ९ तालुक्यांत ७६ शाखा, प्रधान कार्यालय असे विस्तारलेले आहे. २८ शाखा स्वमालकीच्या जागेमध्ये असून बॅंकेच्या बहुतांश शाखा ग्रामीण भागातील सर्वांना सुविधा देत आहेत.
डॉ. चोरगे म्हणाले की, बॅंकेच्या गतवर्षीच्या तुलनेत ठेवींमध्ये २३०.७० कोटीने, कर्जव्यवहारात १९५.३४ कोटीने वाढ झाली आहे. बॅंकेच्या व्यवसायामध्ये ४२६.०४ कोटीने वाढ झाली. तसेच ढोबळ नफ्यामध्ये २६.११ कोटीने वाढ झाली आहे.
बॅंकेचा ढोबळ एनपीए २.९१ टक्के असून नक्त एनपीए ० टक्के एवढा आहे. सलग १३ वर्षे हा एनपीए ० टक्के असून सलग १४ वर्षे बॅंकेने अ ऑडिट वर्ग प्राप्त केला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शेती सहकारी संस्थांना ५.०० लाख कमाल मर्यादेपर्यंत संस्था कार्यालय इमारत बांधकामाकरिता आर्थिक मदत देण्यात येते. बँकेतर्फे १०० संगणक संच जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शाळांना देण्याचे आश्वासन देण्यातत आले होते. त्यानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५० संगणक संच जिल्हा परिषदेकडे सुपूर्द झाऐ आहेत. तसेच उर्वरित ५० संगणक संच सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सुपूर्द करण्यात आले आहेत.
सामाजिक बांधिलकी म्हणून बॅंकेने आपत्ती, उत्कृष्ट खेळाडू, अनाथ आश्रम, दिव्यांग मुलांचे वसतीगृह, शेतकरी कार्यशाळा आदी कारणांसाठी ५५.८५ लाख रुपये मदत केली आहे. मुदतीत पूर्ण परतफेड करणाऱ्या प्राथमिक शेती सहकारी संस्थांना व थेट कर्जदारांना त्यांनी आर्थिक वर्षात एकूण दिलेल्या व्याजाच्या रक्कमेत ०.५० टक्के सवलत देण्यात आली आहे. बॅंकेला सरत्या आर्थिक वर्षात लोकसत्ता संघर्ष सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थविश्व पुरस्कार व भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाचा बेस्ट इनोव्हेटिव्ह बॅंक ऑफ दि इयर ॲवॉर्डने गौरवण्यात आले.
बँकेने ग्राहकांसाठी जिल्ह्यात १९ ठिकाणी ATM सेंटर कार्यान्वित केली असून, त्याद्वारे ग्राहकांना पैसे काढणे, बॅलन्स चेक करणे, मिनी स्टेटमेंट जनरेट करणे इत्यादी सुविधा मिळत आहेत.
पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, ज्येष्ठ संचालक ॲड. दीपक पटवर्धन, रमेश कीर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, राजेंद्र सुर्वे, म. शं. टिळेकर आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 19-04-2025














