रत्नागिरी : बा. ना. सावंत रोड नवीन भाजी मार्केट इमारतीचे भूमिपूजन संपन्न

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात मंजूर झालेल्या नवीन भाजी मार्केट इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी शहरातील विकासकामांना प्रत्यक्ष भेट देऊन ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. कोकणच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

बा. ना. सावंत रोड येथे वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत रत्नागिरी नगरपरिषदेच्या हद्दीत उभारण्यात येणाऱ्या नवीन भाजी मार्केट इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण शुक्रवारी पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते म्हणाले, “आपल्या शहरात होत असलेली विकासकामे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः येऊन पाहिली, ही कामांची पावती आहे. राज्यात तळोजानंतर रत्नागिरी दुसरी स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत आहे आणि त्यासाठी ४५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नवीन मार्केटमध्ये जुन्या व्यापाऱ्यांचे योग्य स्थान कायम राखले जाईल. या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर आणखी निधीची आवश्यकता भासल्यास तोही उपलब्ध करून दिला जाईल. नागरिकांना सुखकर भाजी खरेदीचा अनुभव मिळावा यासाठी निधीची कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, ही इमारत बांधल्यावर तिची स्वच्छता राखणे हे आपले कर्तव्य आहे.”

पालकमंत्री डॉ. सामंत यांनी शहराच्या स्वच्छतेवरही भर दिला. ते म्हणाले, “आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहर स्वच्छ ठेवले पाहिजे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरपरिषदेला ५ एकर जागा आणि साडेआठ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा प्रकल्प वर्षभरात पूर्ण होईल.”

रत्नागिरीतील पर्यटन विकासाच्या योजनांची माहिती देताना पालकमंत्री म्हणाले, “रत्नागिरीत पर्यटकांची संख्या वाढत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय, आरे-वारे येथे ॲडव्हेंचर पार्क आणि संसारे उद्यानात अध्यात्मिक केंद्र व बौद्धविहार साकारले जात आहेत. वर्षभरानंतर रत्नागिरीतून विमानसेवा सुरू होईल आणि विमानतळाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यासोबतच, व्हीआयटी सेमीकंडक्टरचा २० हजार कोटींचा प्रकल्प सुरू होत असून, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे.”

देशातील पहिले स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा आत्मसमर्पण दिन रत्नागिरीत झाला, छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा येथे उभारण्यात आला, असे सांगून त्यांनी कोकणच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. वाटद येथे धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमध्ये स्वदेशी बनावटीच्या बंदुका तयार होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अंमली पदार्थ मुक्त अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे आणि कोणतीही संशयास्पद माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी केले.

नवीन भाजी मार्केट इमारतीच्या तळमजल्यावर १७ गाळे, भाज्यांची ३८ दुकाने, स्वच्छतागृह आणि पहिल्या मजल्यावर ९ कार्यालये व बहुउद्देशीय सभागृह असणार आहे. विद्युत व्यवस्था आणि ड्रेनेज सिस्टीमसह ही इमारत २ कोटी रुपयांच्या निधीतून पूर्ण होणार आहे.
या कार्यक्रमात माजी नगरसेवक राजेश तोडणकर यांनी प्रास्ताविक केले. भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, बंड्या साळवी, स्मितल पावसकर, राहूल पंडित, बिपीन बंदरकर, राजन फाळके, बाबूशेठ भाटकर, ॲड. बाबासाहेब परुळेकर, प्रमोद रेडीज, अजय गांधी, पल्लवी पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 19-04-2025