राजापूर : मुंबई घडवण्यासाठी गिरणी कामगारांची महत्त्वाची भूमिका होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये व महाराष्ट्र राज्य आर्थिक सक्षम बनवण्याचे काम कोणी केले असेल तर ते मुंबईतील गिरणी कामगारांनी होय. त्यामुळे कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजे यासाठी सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे आझाद मैदानावर शेवटचा एल्गार पुकारणारच. यासाठी सर्व गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पाठिंबा देत सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ उर्फ अण्णा शिर्सेकर यांनी राजापुरातील गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना केले आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ गिरणी कामगार घराच्या प्रश्नांवर राज्यभर कामगार व वारसांच्या सभा घेत जनजागृती करण्याचे काम करत आहे. यासंदर्भात राजापुरात डॉ. आंबेडकर भवनमध्येही सभा झाली.
रखडलेला गिरणी कामगार घरांचा प्रश्न ताबडतोब मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधितांची त्वरित बैठक बोलवावी, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी दिले होते; परंतु अद्याप बैठक बोलावण्यात आली नाही. यावरून सरकारची या प्रश्नावर अनास्था दिसून आली आहे. सरकारने १ मेपर्यंत याबाबत निर्णय न घेतल्यास महाआंदोलन छेडणारच, असा इशारा रघुनाथ शिर्सेकर यांनी दिला. या वेळी सुनील बोरकर, काशिनाथ माटल, कमलाकर कदम, नारायण पांचाळ आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 19/Apr/2025














