चिपळूण : खडपोली एमआयडीसीत वारंवार वीज खंडित

चिपळूण : तालुक्यातील खेर्डी व खडपोली औद्योगिक वसाहतीमध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित होतो. तसेच कमी-जास्त दाबाने पुरवठा होत असल्याने उद्योजकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या दोन्ही औद्योगिक वसाहतीमध्ये वीजपुरवठामध्ये सातत्य राहावे, अशी मागणी नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनने येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता गेडाम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार किरण सामंत यांनी कार्यकारी अभियंत्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून उद्योजकांच्या अडचणी समजून तातडीने उपाययोजना करावी, अशा सूचना दिल्या. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या विषयी लवकरच बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिली आहे. या वेळी नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल त्यागी, उपाध्यक्ष गजानन कदम, सहकार्यवाह अविनाश शिंदे, श्री एम पेपरमिलचे स्वामी, उदय शेंडे, रौफ खतीब, शशिकांत देसाई, वैभव सुर्वे, तुकाराम डबाणे आदी उपस्थित होते. एमआयडीसी परिसरात विद्युतपुरवठा करणारा फीडर हा स्वतंत्र ठेवावा जेणेकरून त्याचा देखभालीचे काम कमी होईल. तसेच या विभागातील सर्व जोडण्या खांबावरून न देता भूमीगत पद्धतीने द्याव्यात.

त्यामुळे एमआयडीसी विभागात येणाऱ्या मोठे कंटेनर, पावसाळ्यातील वाऱ्यामुळे होणारा शटडाऊन टाळता येईल. सध्या खेडों व खडपोली भागात असलेल्या वीजमंडळाचा कर्मचारी आणि अधिकारी यांना त्यांच्या कामाबाबत पूर्ण माहिती नाही अथवा त्यांना विद्युतपुरवठा बंद झाल्याने उद्योजकांच्या अडचणी व नुकसानीचे गांभीर्य नाही, असे दिसून येते. त्यामध्ये त्वरित बदल होऊन औद्योगिक क्षेत्राच्या देखभालीसाठी जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 19/Apr/2025