पालीचा पाणीपुरवठा चार दिवस बंद

पाली : चौपदरीकरणामुळे पाईपलाईन फुटून पालीतील पाणीपुरवठा चार दिवस बंद झाला आहे. यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. आता ऐन उन्हाळ्याच्या भीषण पाणीटंचाईमध्ये ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे काम करताना पाईपलाईन फुटल्याने गेले चार दिवस पाली बाजारपेठेचा पाणीपुरवठा पूर्ण बंद झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे सपाटीकरणाची चौपदरीकरणासाठी व उड्डाणपूल उभारणीची प्रक्रिया ही गेल्या काही वर्षांपासून पाली बाजारपेठ या भागात प्रस्तावित महामार्गालगत सुरू करण्यात आली आहे, मात्र त्यावेळी तेथून असणारी पूर्वीची पाली ग्रामपंचायतीची शासकीय नळपाणी योजनेची पाईपलाईन अन्यत्र हलविणे गरजेचे होते; परंतु त्याच्यावरच भराव टाकून काम करण्यात आल्याने ती अनेक ठिकाणी वारंवार फुटते. त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत आहे.

बाजारपेठेत तर अनेकदा या अर्धवट केलेल्या सपाटीकरणावरून वाहने गेल्याने ती तुटून पाण्याचा अपव्यय होऊन पाणीपुरवठा बंद सहत आहे. शिवाय मोठा भराव असल्याने तो बाजूला करून दुरुस्त करण्यातही बराच वेळ लागतो. पाली बाजारपेठेला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन महामार्गालगत असल्याने तिचे स्थलांतर तातडीने करण्याची गरज आहे. किमान ठेकेदाराने पाईपलाईन दुरुस्त होईपर्यंत त्यांच्याकडे असणाऱ्या टँकरने ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 21-04-2025