साखरपा : माझी वसुंधराअंतर्गत केलेली कामे ऑनलाइन करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेले संगणक परिचालक सुटीच्या दिवशीही कामाला जुंपलेले आहेत. आधीच ४ महिने मानधन नाही आणि त्यात सुटीच्या दिवशीही काम करावे लागत असल्यामुळे परिचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या जिल्ह्यात सर्वत्र माझी वसुंधरा कार्यक्रमाअंतर्गत केलेली कामे ऑनलाइन करण्याची धावपळ सुरू आहे. माझी वसुंधरा या कार्यक्रमाअंतर्गत मागील आर्थिक वर्षात गावात विविध पर्यावरणपूरक कामे करण्यात आली आहेत. या कामांची नोंद ऑनलाइन करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.
ही सर्व कामे २० तारखेपर्यंत ऑनलाइन करण्याचे आदेश पंचायत स्तरावरून देण्यात आले आहेत. यामुळे परिचालक शुक्रवारी गुडफ्रायडेची सुटी असूनही ग्रामपंचायतींमध्ये जाऊन काम करत होते. एका दिवसात हे काम पूर्ण न झाल्यामुळे शनिवारीही सुटी असूनही अनेक परिचालक ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहून काम करत आहेत.
संगणक परिचालकांना गेले ४ महिने मानधन मिळालेले नाही. त्यासाठी त्यांनी आपले म्हणणे पालकमंत्री उदय सामंत, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर मांडले आहे. असे असतानाही केवळ आश्वासनांवर त्यांची बोळवण करण्यात आली आहे.
दुसरीकडे मानधनाविना उपासमारीची वेळ आली असतानाही माझी वसुंधराच्या कामासाठी परिचालकांना हक्काची सुटी असूनही कार्यालयात जाऊन काम करावे लागते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 21/Apr/2025














