रत्नागिरी : हातखंबा तिठा येथील क्रॉसिंगमुळे अपघाताची शक्यता?

रत्नागिरी : मिऱ्या – नागपूर महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचे काम तुकड्यात सुरू आहे. ठेकेदार कंपनीचे कामकाज हातखंबा तिठा येथे येऊन ठेपले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून रत्नागिरी शहराकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने याच ठिकाणी क्रॉसिंग रस्त्याचे जंक्शन तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र, सद्यस्थितीत वाहने इकडून तिकडून कशाही पद्धतीने रस्ता क्रॉस करत असल्यामुळे अपघाताचा संभव आहे.

मिऱ्या-नागपूर महामार्ग होत असल्याने हातखंबा तिठा परिसराचे रूपच पालटण्यात आले आहे. या भागात प्रचंड माती उसळत असून मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट हवेत पसरतात. यामुळे रिक्षाचालकांसह प्रवासी हैराण झाले आहे. रात्रीचा प्रवास तर जून धोकादायक ठरत आहे. रात्रीच्या अंधारात डोळे दिपवून टाकणारा हेडलाईटचा लख्ख प्रकाश अन् विरुद्ध दिशेने धावणारी वाहने अपघाताला निमंत्रणच देत आहेत.

तसेच महामार्ग काँक्रटिकरणाच्या मर्गिकची उंची वाढल्याने तात्पुरत्या स्वरूपात जोड रस्त्याला मध्यम खडीचा वापर करणे आवश्यक असताना याठिकाणी मोठ्या खडीचा भराव केला जातो. मोठ्या खडीवरून वाहने हाकताना दुचाकी चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणीही काळजी घेत नसल्याचे वारंवार दिसून येते. याकडे महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी डोळेझाक करून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेला शिस्त राहिलेली नाही. यातून लहान मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. हातखंबा ते मिऱ्या दरम्यान नागपूर-मिऱ्या महामार्गाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी डायव्हर्जन बोर्ड नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करत ठिकठिकाणी रिफ्लेक्टर, वाहतूक सुरक्षा पट्टी, सुरक्षा बोर्ड लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. ठेकेदार कंपनीकडून सूचनांचे पालन ही करण्यात आले आहे.

परंतु खोदलेल्या सर्विस रोडवरील पाण्याने टणक झालेल्या खड्ड्यांची स्थिती जैसे थे आहे. टणक झालेल्या खड्‌ड्यानी वाहनचालकांचे कंबरडे मोडत आहे, नागरीकांना रस्त्यांचा विकास नकोसा वाटतं आहे. या खड्ड्यांवर रोलर फिरवून खड्डे निर्माण होणार नाहीत यावर उपाययोजना करण्याकडे ठेकेदार कंपनीने लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवासी नागरिकांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:00 PM 22/Apr/2025