पाली : भावी आयुष्यात उपयुक्त ठरणारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शालेय जीवनात उपलब्ध करून देण्याचा आगळावेगळा उपक्रम रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नाणीज क्र. १ मध्ये राबविण्यात येत आहेत. त्यामुळे नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेसाठी नाणीज शाळा पात्र ठरली आहे. शैक्षणिक क्षेत्रात या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल देश पातळीवरही घेतली जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कौशल्यासोबतच मतदान, बॅंकिंग, परसबागेतील शेती, व्यावसायिकता, छोटे प्रक्रिया उद्योग, पाककला स्पर्धा यासह कौशल्य विकास विषयक प्रशिक्षण दिले जात आहे.
नाणिज शाळेत पूर्ण वर्षातील शालेय अभ्यासक्रम व उपक्रमांच्या नियोजनासाठी पूर्वतयारी मेळावा घेतले जातात. वाचन प्रेरणा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वृत्तपत्र वाचनाची सवय लागावी म्हणून बालवाचनालय व वृत्तपत्र स्टॅण्ड ही नवीन संकल्पना शाळेत राबवली जात आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच बँकिंग प्रणाली व बचतीची सवय लागावी यासाठी विद्यार्थी बचत पेटी उपक्रम सुरू केला आहे. स्पर्धा परीक्षा गुणगौरव सोहळा, शेती प्रक्रियेची माहिती प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना करून दिली जाते. विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत असले तरीही त्यांना आतापासूनच लोकशाही व्यवस्थेची माहिती व्हावी म्हणून त्यांना मतदान जनजागृती केली जाते. मिशन आपुलकी या उपक्रमातून माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या माध्यमातून शाळेला आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख रुपयांची देणगी मिळाली आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती उपक्रमांतर्गत आरोग्याला पोषक अशा तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांची पाककला स्पर्धा घेण्यात येते. विक्री व विपणन कलेचे प्रात्यक्षिक व अनुभव मिळण्यासाठी २००० नग राख्याची निर्मिती, प्रदर्शन व विक्री त्याचसोबत दिवाळीमध्ये ५०० नग सुगंधी उटणे पाकीट निर्मिती व विक्री असे हंगामी व्यवसाय केले जातात. गतिमान माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थी अधिक गतिमान राहण्यासाठी डिजिटल शाळा उपक्रम सुरू केलेला आहे. आनंददायी शनिवारसाठी क्रीडागणवेश ठेवण्यात आला आहे.
शाळेतील शैक्षणिक उपक्रमांसाठी गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर, केंद्रप्रमुख गोविंद तारवे तसेच नाणिजचे सरपंच विनायक शिवगण, गौरव संसारे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष निशा बेंडल, उपाध्यक्ष श्रीराम दाणी व सर्व पालक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभते तसेच हे सर्व उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पाटील उपशिक्षक मनोज कुमार खानविलकर विद्यार्थ्यांसाठी राबवित आहेत.
व्यवहार ज्ञानासाठीचे प्रात्यक्षिक
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तात्काळपणे उपलब्ध होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबू नये आणि अभ्यासासोबत त्यांना वस्तूंचे आदानप्रदान त्यामधील व्यवहारज्ञान समजावे या उद्देशाने शाळेमध्येच वस्तूंचे विद्यार्थी भांडार सुरू केलेले आहे. ज्यामध्ये ग्राहक आणि विक्रेते हे दोघेही विद्यार्थीच असतात. जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यवस्थापन विपणन व विक्री कौशल्य याचे प्रात्यक्षिक व अनुभव मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 22-04-2025














