रत्नागिरी : पाण्याच्या संवर्धनासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करण्याची सूचना

रत्नागिरी : जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यांतर्गत पाणी विषयाशी निगडित सर्व क्षेत्रामध्ये अधिक प्रभावीपणे काम करावे, त्या अनुषंगाने कालवा साफसफाई, स्वच्छ सुंदर कार्यालय, जलपुनर्भरणाची कार्यवाही स्वत:पासून सुरू करावी, जलसंपदा विभागाने प्रलंबित असणारी भूसंपादनाची कामे मार्गी लावावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता गणेश सलगर, कार्यकारी अभियंता विवेक सोनार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, १०० दिवस कृती आराखड्याअंतर्गत जिल्हाधिकारी परिसरातील तिन्ही इमारतींमधील कार्यालयांना भेट द्यावी. त्याप्रमाणे स्वच्छ सुंदर माझे कार्यालय अंतर्गत आपल्या विभागाची सर्व कार्यालयांची साफसफाई करावी. ही साफसफाई दररोज होते का, हे पाहणे आवश्यक आहे. माहिती अधिकारासह अन्य तक्रारींचे निरसन शून्य संख्येत व्हायला हवे, त्याचबरोबर कालवा सफाईसारखे स्वत:हून काही कार्यक्रम घ्यावेत, प्रत्येकाने जबाबदारीने कामे करावीत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या समवेत आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन यावर कार्यक्रम करावा. पाणी वापर संस्था सक्षमीकरण यावर कार्यशाळा घ्यावी. शेतकरी पाणी वापर संस्था यांचा संवाद होत आहे का, यावरही भर द्यावा, असेही ते म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 22-04-2025