रत्नागिरी : राज्य शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या निर्णयामुळे जिल्ह्यातील ६७ शाळा शून्यशिक्षकी होणार आहेत. २५०पेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त होत आहेत. या निर्णयाप्रमाणे संचमान्यता निश्चित करणे म्हणजे राज्यातील मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळा बंद करण्याप्रमाणे आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी केली.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा वार्षिक जिल्हा मेळावा चिपळूण मिरजोळी येथील दलवाई हायस्कूल येथे झाला. त्या वेळी ते बोलत होते. टीडीएफचे राज्य कार्याध्यक्ष तथा माध्यमिक अध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष नरसू पाटील, मिरजोळी शिक्षणसंस्थेच्या शालेय समितीचे अध्यक्ष खालिद दलवाई व कार्याध्यक्ष संभाजी देवकते यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ उपाध्यक्ष सुशांत कविस्कर, सुनील मिटकरी, अर्चिता कोकाटे, संघटनेचे सल्लागार गणपत शिर्के, गिरीश पाटील सुरेश चिकने, पतपेढीचे उपाध्यक्ष किशोर नागरगोजे, मानद सचिव आशाराणी गावडे व संचालक, सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, सचिव, जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिपळूण तालुकाध्यक्ष सुरेश मोरूस्कर यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. जलसंपदा विभागाचे संतोष अनुसे यांनी पेन्शन योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी शासनाची बदलती धोरणे व शिक्षक संघटनेची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. नरसू पाटील यांनी जिल्हा संघटनेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. सभासदांना टीडीएफच्या २६ एप्रिलला पालघर येथे होणाऱ्या राज्य अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. मेळाव्याला जिल्ह्यातून ४०० सभासद उपस्थित होते.
पाचजणांना जीवनगौरव
जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी राज्य अधिवेशनामध्ये जिल्ह्यातील पाच मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये ज्येष्ठ सल्लागार सदाशिव चावरेकर, गणपत शिर्के, रामचंद्र महाडिक, गिरीश पाटील, सुरेश चिकने यांचा समावेश असल्याचे त्यांनी जाहीर केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 22/Apr/2025














