रवींद्र उर्फ अण्णा सामंत यांना कुटुंबप्रमुख पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : जिल्हयातील प्रतिथयश उद्योजक रवींद्र उर्फ अण्णा सामंत यांना कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाचा रत्नागिरी जिल्हयाचा कुटुंबप्रमुख हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयातील वेंगुर्ले गावातील मुळ रहिवासी असलेले अण्णा सामंत यांनी व्यवसायानिमित्त रत्नागिरीतील पाली या गावात स्थायिक होऊन विविध व्यवसायात चांगला जम बसवला. आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक गरजवंतांना सढळ हस्ते मदत करणे, योग्य मार्गदर्शन करणे, व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत समाजकारण करत एक आदर्श निर्माण केला आहे.

कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाच्या माध्यमातून आपल्या ज्ञातीच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सदैव अग्रेसर रहाणे या सर्व बाबींची दखल घेत रत्नागिरी जिल्हयाचा कुटुंबप्रमुख या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.

लवकरच हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे असे कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष योगेश सामंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 23-04-2025