दापोली : दापोलीत वणवा लागण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. तालुक्यातील चांदिवणे, देहेण, सुकोंडी, सातांबा गावांच्या महसुली क्षेत्रात लागलेल्या वणव्याने येथील शेतकऱ्यांच्या आंबा-काजूच्या बागा पार होरपळून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
दापोली तालुक्यातील सुकोंडी, चांदिवणे, सातांबा तसेच देहेण या महसुली गावाच्या हद्दीत वणवा लागला. या वणव्याचे कारण निश्चित झाले नसले तरी चांदिवणे महसुली गावाच्या हद्दीतून महावितरणच्या ११ केव्ही वीज वाहिनीवरील स्पार्किंगमुळे सुक्या गवतावर आगीच्या ठिणग्या पडून वणवा भडकल्याचा अंदाज आहे.
याबाबत चांदिवणे येथील शिवसेना केळशी विभाग मुंबईचे विभाग संघटक सुहास तांबट यांनी महावितरण अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला; मात्र महावितरणने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. चांदिवणे येथील उंबराची मलई (बावलवर) स्थानिक शेतीचे नाव असलेल्या या ठिकाणी पार्वती धोंडू पवार, संतोष खेडेकर, प्रकाश वणगुळे, अशोक जोशी, बटावले, आशिष तांबट आदी अनेकांच्या आंबा-काजूच्या बागा पूर्णपणे आगीत होरपळल्या आहेत. त्यामुळे आंबे आणि काजू बिया होरपळल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न नष्ट झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 24/Apr/2025














