संचमान्यतेवर रत्नागिरीतील शिक्षकांचा बहिष्काराचा निर्णय

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना समन्वय समितीने १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार केलेल्या संचमान्यतेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष आयुब मुल्ला व सचिव सागर पाटील यांनी दिली.

राज्यातील सर्व संघटनांचा विरोध असतानाही प्रशासनाने २०२४-२५ ची संचमान्यता १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे निश्चित केली आहे. यामुळे जिल्ह्यातील ६७ पेक्षा अधिक माध्यमिक शाळा शून्यशिक्षकी होत आहेत. संचमान्यतेसंदर्भात चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार करण्यात आलेल्या संचमान्यतेमुळे जिल्ह्यातील माध्यमिक शाळेवर होणाऱ्या विपरीत परिणामावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शासन निर्णय अन्यायकारक असून या शासन निर्णयानुसार संचमान्यता करणे म्हणजे मराठी व उर्दू माध्यमाच्या अनुदानित शाळा कायमस्वरूपी बंद करणे असा आहे. त्यामुळे जोपर्यंत शासन स्तरावरून हा शासन निर्णय रद्द होत नाही, तोपर्यंत संचमान्यते संदर्भातील कोणतीही माहिती अथवा कागदपत्र शिक्षण विभाग अथवा अन्य कोणत्याही कार्यालयाला न देण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला आहे.

यासंदर्भात पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची समन्वय समितीच्या वतीने भेट घेण्यात येणार आहे. शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांवर होणारे विपरीत परिणाम निदर्शनास आणून देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे आयुब मुल्ला व सागर पाटील यांनी स्पष्ट केले.

समन्वय समितीच्या बैठकीला मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा समन्वय समितीचे अध्यक्ष आयुब मुल्ला, अध्यापक संघाचे अध्यक्ष व समन्वय समितीचे सचिव सागर पाटील, अध्यापक संघाचे सचिव रोहित जाधव, शिक्षक परिषद संघटनेचे सचिव पांडुरंग पाचकुडे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप वाघोदे, शिक्षक भारती संघटनेचे सचिव निलेश कुंभार, उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शौकत महाते, कास्ट्राईब संघटनेचे सचिव प्रकाश पांढरे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण गोरे उपस्थित होते.

१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार संचमान्यता केल्यास जिल्ह्यातील अडीचशे पेक्षा जास्त शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. यामुळे पवित्र पोर्टलमार्फत होणारी भरती पूर्णतः थांबवावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व रिक्त जागांवर समायोजन करूनही ८० पेक्षा अधिक शिक्षकांचे जिल्ह्याबाहेर समायोजन करावे लागणार आहे. ६७ पेक्षा अधिक माध्यमिक शाळा शून्यशिक्षकी होणार आहेत. हा शासन निर्णय रद्द करावा यासाठी राज्यातील सर्व संघटना प्रयत्नशील आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 25-04-2025