मंडणगड : हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त आयोजित शक्तीतुरा तमाशा स्पर्धेत भैरवनाथ कलापथक नरवणने (ता. महाड) प्रथम क्रमांक पटकावला. चिंचाळी (मंडणगड) येथील काळभैरव तमाशा कलापथकाने द्वितीय तर तळेघर करावडेवाडी येतील जननीदेवी तमाशा कलापथकाने तृतीय क्रमांक पटकावला. संवाद आणि वडपाले ही कलापथकांना अनुक्रमे चार व पाच क्रमांक मिळाला.
गोरेगाव तालुक्यातील मूर ग्रामस्थांच्या वतीने कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कलामंडळ रायगड, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत रत्नागिरी-रायगड जिल्ह्यातील एकूण पाच तमाशा मंडळांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये काळभैरव तमाशापथक वडपाले, भैरवनाथ कलापथक नरवण, जननीदेवी तमाशा कलापथक तळेघर करावडेवाडी, काळभैरव तमाशा कलापथक चिंचाळी, शिवकृपा तमाशा कलापथक संवाद या तमाशा मंडळांचा समावेश होता प्रत्येक कलापथकाला सादरीकरणासाठी दोड तास वेळ दिला होता. त्यात स्तवन, गण पहिली गौळण, दुसरी गौळण, कृष्ण खूण, सुदाम खूण व पद अशा विभागांचे सादरीकरण करून रंगभूषा, वेशभूषा, वादन व शाहिरी संवाद यांचे परीक्षण करण्यात आले.
या स्पर्धेचे प्रमुख निरीक्षक म्हणून रामभाऊ टेंबे, रमेश घडवले, विद्यानंद अधिकारी, महादेव माळी यांनी काम पाहिले. काव्य विभाग क्र. १ चे परीक्षण सचिन माळी, प्रकाश कळंबे यांनी केले. काव्य विभाग क्र. २ चे परीक्षण प्रशांत नाकती, संतोष भात्रे यांनी केले.
मावशी पात्र, नृत्य कलाकार परीक्षण अरूण नाकती, सुनील शिगवण यांनी केले. ढोलकीवादन परीक्षण सिद्धार्थ शेलार यांनी केले. या स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर देण्यास मात्र सर्व कलापथकांना अपयश आले. ही स्पर्धा पाहण्यासाठी लोककला रसिकांनी मोठी गर्दी केली होती
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 25/Apr/2025














