रत्नागिरी : नादुरुस्त होऊन निष्कासित झालेल्या, किंवा समुद्रात लाटांमुळे बुडालेल्या नौकांचे रजिस्ट्रेशन वापरुन भलत्याच नौका १० वावाच्या आत पर्सिनेट जाळ्याद्वारे मासेमारी करत असल्याचे आरोप बुडीत नौकाच्या मालकांकडून करण्यात आला आहे.
मासेमारीसाठी वापरात नसलेल्या मच्छीमार नौकांचे नाव रजिस्ट्रेशन नंबर वापरून दुसऱ्याच नौका बेकायदेशीर मासेमारी करत असल्याचे ड्रोन कॅमेराने टिपलेल्या छायाचित्रावरून चव्हाट्यावर आला आहे. ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्रानुसार मत्स्यव्यवसाय विभागाने सुनावणीसाठी येण्याची नोटीस संबधित रजिस्ट्रेशन नावावर असलेल्या मालकांना आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे.
या प्रकरणी संबंधित नौका मालकांनी पोलिस अधिक्षकांसह सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाकडे तक्रारी करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रत्नागिरीच्या समुद्रात अल फातिमा नावाची नौका प्रतिबंधित क्षेत्रात मासेमारी करत असल्याचे ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेल्या छायाचित्रातून स्पष्ट झाल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाकडून सुनावणी कार्यवाहीसाठी नौका मालकांना नोटीस देण्यात आली. नौका मालक मुस्ताक मोहम्मद वस्ता यांना ही नोटीस मिळाली.
नोटीस मिळाल्यानंतर नौका मालक सुनावणीसाठी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त तथा अधिनिर्णय अधिकाऱ्यांसमोर गेले असता त्यांनी आपल्या नौकेबाबत माहिती दिली. त्यांची अल फातिमा नावाची नौका वर्षभरापूर्वीच समुद्रात लाटेच्या माऱ्याने समुद्रात वाहून जात बुडून पूर्णतः नष्ट झाली आहे. ही माहिती त्यांनी अभिनिर्णय अधिकारी तथा सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांसमोर मांडली. त्याचबरोबर आपल्या नौकेचे नाव नंबर वापरून कोणीतरी बेकायदेशीर नौकेने मासेमारी करत असल्याची लेखी तक्रारही केली आहे. सागरी सुरक्षेच्यादृष्टीने हीच तक्रार पोलिस अधीक्षकांकडेसुद्धा करण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने तपासणी करण्याची विनंतीही तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
दुसरी जाविदी मासेमारी नौका प्रतिबंधित समुद्र क्षेत्रात एलईडी प्रकाशात मासेमारी करत असल्याने नौका मालक असिफ जावेद वस्ता यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले. ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेले या नौकेचे छायाचित्र दाखवण्यात आले. त्यावेळी नौका मालकाला ती नौका त्यांची नसल्याचे लक्षात आले. याबाबत नौका मालक असिफ वस्ता यांनीही पोलिस अधीक्षकांसह सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आपल्या बोटीचा क्रमांक आणि नाव दुसऱ्याच बोटीवर लाऊन बेकायदेशीर मासेमारी केली जात आहे. याबाबत पोलिस आणि मत्स्यव्यवसाय विभागाने चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 26/Apr/2025














