पहलगाममधील हल्ल्याचा देवरुखमध्ये निषेध

साडवली : काश्मीर पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. त्यामध्ये २८ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. या भ्याड हल्ल्याचा देवरुखवासीयांनी एकत्र येत जाहीर निषेध केला आहे. पाकीस्तानमधील दहशतवाद समूळ नष्ट करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

देवरुखमधील श्री सोळजाई ग्रामदेवी देवस्थानतर्फे शहरवासीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. शनिवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजता देवरुख नगरपंचायतीजवळ नागरिक एकवटले. यावेळी शहरातील हिंदू – मुस्लिम नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष करीत घटनेचा निषेध नोंदवला. याप्रसंगी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. नगरपंचायतीपासून हा मोर्चा माणिक चौक, बाजारपेठ, बसस्थानक या मार्गावरुन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आला. या ठिकाणी देवस्थानचे अध्यक्ष बापू गांधी, मदन मोडक, हनिफ हरचिरकर, रोहन बने, संतोष लाड यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थितांनी मेणबत्ती प्रज्वलीत करुन श्रद्धांजली वाहिली.

या मोर्चाने देवरुखमधील हिंदु-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले. आम्ही भारतीय आहोत, आम्ही दहशतवादाचा निषेध करतो, असा संदेश दिला. काश्मीर आमचेच आहे, आमचेच राहील तसेच भारतात दहशतवादाला थारा देणार नाही, असा व्यक्त केला. यावेळी देवरुख पोलिसांचा बंदोबस्त होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 28/Apr/2025