खेड : आवाशी-गुणदेफाटा येथे अंडरपासचे काम संथ गतीने

आवाशी : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील आवाशी-गुणदेफाटा येथील अंडरपासचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे येथील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर असल्याने पावसाळ्यात परिसरातील ग्रामस्थांचे हाल होणार आहेत.

आवाशी-गुणदे फाटा येथे रस्ता पूर्ण झाल्यानंतर अंडरपासचे काम सुरू करण्यात आले आहे. मुंबईच्या दिशेने येताना आवाशी-गुणदे फाटा हे ठिकाण लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार आहे. याच ठिकाणी खेड, चिपळूण आगारातून ये-जा करणाऱ्या एसटी बसेससाठी बसथांबा आहे.

त्याचबरोबर चिपळूण व खेड आगारातून इथल्या पूर्वेकडील गावात जाणाऱ्या एसटी बसही अंतर्गत रस्त्यावर येथूनच ये-जा करतात. औद्योगिक वसाहत असल्याने दर सेकंदाला इथे वाहतूक सुरू असते.

या सगळ्या गोष्टीचा विचार करून बांधकाम विभागाने इथे अंडरपास निर्मितीला मागील चार महिन्यांपासून काम सुरू केले आहे. मात्र, हे काम संथ गतीने सुरू असल्याने बसची वाट पाहत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. अंतर्गत रस्ता पूर्णतः उखडल्याने सातत्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. पावसाळ्यापूर्वी हा मार्ग वाहतुकीला खुला न झाल्यास अनेक समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

पावसाळा अगदी जवळ येऊन ठेपला आहे. मात्र, तत्पूर्वी हे काम करण्याबाबत कोणतीच हालचाल केलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर प्रवाशांचे हाल होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 29/Apr/2025