लांजा : तालुक्यात रस्त्याने फिरणारे मनोरुग्ण उपचारानंतर बरे झाल्यामुळे सर्वजण आपापल्या घरी पोहोचलेले आहेत. लांजा पोलिस ठाणे, टीडब्ल्यूजे फाउंडेशन व जिजाऊ फाउंडेशनची ही मोहीम शंभर टक्के यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. लांजा तालुक्यातील बेवारस फिरणाऱ्या काही मनोरुग्णांना चार महिन्यांपूर्वी रत्नागिरी येथे मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
लांजाचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, नागपुर येथील टीडब्ल्यूजे फाउंडेशनचे व्यवस्थापक सुमंत ठाकरे तसेच जिजाऊ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबवत लांजा येथील काही व्यक्तींना उपचारासाठी सलागिरी येथे २९ जानेवारी रोजी पाठवण्यात आले होते. या मोहिमेचे रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही कौतुक केले होते तर यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार अशी मोहीम राबवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार मनोरुग्णांना रत्नागिरी येथे दाखल केले होते.
रस्ते, पर्यटनस्थळे, बसस्थानक, रेल्वेस्थानक, शाळा, कॉलेज परिसर आदी सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या मनोरुग्णांवर उपचाराच्यादृष्टीने पोलिस ठाण्याच्यावतीने कार्यवाही करण्यात आली होती. टीडब्ल्यूजे फाउंडेशनच्या स्वयंसेवकांकडून अशा मनोरुग्णांना आंघोळ घालण्यापासून त्यांची स्वच्छता करून पोलिस व आरोग्य विभागाच्या मदतीने रुग्णवाहिकेतून रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात दाखल करण्यात येते. तेथे रुग्ण बरा झाला की, त्याला काही काळ जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात येते व त्यानंतर रुग्णाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येते. दरम्यान, लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बगळे यांच्यासह टीडब्ल्यूजे फाउंडेशन व जिजाऊ फाउंडेशनच्या या सामाजिक कार्याबद्दल समाधान व कौतुक होत आहे.
ओळख पटवण्याचे आव्हान
अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या मनोरुग्ण व्यक्तींकडून महिला, बालके किंवा इतर नागरिकांच्या सुरक्षेला, मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो. काहीवेळा मनोरुग्ण व्यक्ती रात्री-अपरात्री रस्त्यावर फिरत असताना अपघातही होतात. अशावेळी अपघातग्रस्त व्यक्तींची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. याचा विचार करता मनोरुग्ण व्यक्तींचे पुनर्वसन होण्याच्यादृष्टीनेच अशी मोहीम राबवण्यात आली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 03/May/2025














