देवरूख : हातीव गावातून सप्तलिंगी नदीच्या सर्वेक्षणाला सुरुवात

रत्नागिरी : देवरूख परिसरातील १८ गावांमधून वाहणाऱ्या सप्तलिंगी नदीच्या पुनरुज्जीवन आणि विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, हातीव गावातून नदी सर्वेक्षणाला प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे. या उपक्रमात नागरिक, विविध विभागांचे अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

सप्तलिंगी नदीच्या संरक्षणासाठी क्रांती व्यापारी व अॅग्रोस्टार फार्म फ्रेश कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने देवरूख पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात दुसरी सप्तलिंगी परिषद पार पडली. यावेळी जलसंपदा विभागाचे तिरमारे, सामाजिक वनीकरण विभागाचे माळी, कृषी विभागाचे झंजे, नाम फाउंडेशनचे कोकण प्रमुख जानवलकर, युयुत्सु आर्ते, हेमंत तांबे, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, रोहन इंगळे, अॅग्रोस्टारचे अध्यक्ष शेलार, दीपक लिंगायत, नरेश सावंत, देवदत्त शेलार, निखिल कोळवणकर, अण्णा बेर्डे आणि संदीप वेल्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

परिषदेत सप्तलिंगी नदीला राज्यातील आदर्श नदी म्हणून विकसित करण्याचा दृढ निश्चय करण्यात आला. या उद्देशासाठी सर्व शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय ठेवत कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रारंभी तळवडे, हरपुडे आणि हातीव या गावांतून सर्वेक्षण सुरू करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार हातीव गावातून प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात करण्यात आली.

सप्तलिंगी नदीला जोडणाऱ्या परे, देवरहाटी आणि मुख्य नदी पात्राची पाहणी करण्यात आली. तसेच नदीचा उगमस्थान असलेल्या हरपुडे गावातही सर्वेक्षण पार पडले. नदी बारमाही प्रवाही कशी राहील, स्थानिकांना स्वच्छ पाणी पुरवठा कसा करता येईल याबाबत कार्यशाळेत सखोल चर्चा करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 07/May/2025