चिपळूण : शहरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली १२ कोटी ६१ लाख रुपयांची कामे बोगस होत आहेत. याची तक्रार करून दोन महिने झाले तरी संबधित ठेकेदारांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे याकडे दुर्लक्ष का असा सवाल माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निवेदनाद्वारे केला आहे. चौकशीसह १५ दिवसांत कारवाई न झाल्यास नगर परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा श्री. शिंदे यांनी दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपण व अन्य सहकाऱ्यांनी त्यांच्याकडून १२ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यातून शहरात अनेक विकासकामे झाली असून काही कामे आजही सुरू आहेत. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
त्यामुळे आपण या कामांची चौकशी करावी व तोपर्यंत संबधित ठेकेदारांची बिले अदा करू नयेत. तसेच २०२२ पासून न.प. प्रशासकीय कारभार आहे. या काळातही झालेली कामे व सध्या सुरू असलेली कामे बोगस आहेत. त्यामुळे आजपर्यंत झालेल्या कामांची यादी व त्यापुढे त्या कामाची रक्कम दर्शवणारी माहिती मिळावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. याचबरोबर शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पात गॅसीफायर यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रूपयांचा चुराडा झाला असून गॅसीफायर व अन्य कामे बोगस व निकृष्ट दर्जाची झाली आहेत. कामांची चौकशी करुन दर्जाबाबत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत ठेकेदारांची बिले अदा करू नयेत, अशी मागणी श्री. शिंदे यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 08/May/2025














