चिपळूण : मुंबई-गोवामहामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाळा जवळ आल्याने या कामासाठी लगीनघाई सुरू झाली आहे. धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
दरडीच्या खालच्या बाजूने गॅबीयन वॉल उभारण्याचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
तीन महिन्यांपूर्वी घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबीयन वॉल उभारण्याचे कामही वेगाने सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. गॅबीयन वॉलच्या माध्यमातून मजबुतीकरणाचे अर्धे काम पूर्ण झाले आहे. अजून काही दिवसांत हेही काम पूर्ण करून घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीस खुले केले जाणार आहेत.
दोन ठिकाणी कृत्रिम धबधबे
परशुराम घाटाच्या पायथ्याशी सर्वांचे आकर्षण असलेला सवतसडा धबधबा पावसाळ्यात धो धो वाहतो. मात्र आता या घाटात नव्या बांधकामामुळे दोन धबधबे तयार झाले आहेत. तेही पर्यटकांसाठी आकर्षण ठरतील. मात्र प्रत्यक्षात हे धबधबे नसून घाटात धोकादायक ठिकाणी वाहून येणारे पाणी टप्प्याटप्प्याने खाली यावे व त्याचा वेग व्हावा, या उद्देशाने ही रचना करण्यात आली आहे.
दरड कोसळू नये म्हणून जाळ्यांचा पर्याय
- या घाटात एका बाजूला २२ मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित दुर्घटना घडत आहेत. याशिवाय घाटात काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु असल्याने वाहनांच्या अपघाताचे प्रमाण कायम आहे.
- आता धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवली जात आहे. खडकात व दरडीच्या भागात लोखंडी सळ्या घुसवल्या जात आहेत आणि त्यावर जाळी बसवली जात आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
आता या कामाचा वेग आणखी वाढवला असून धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्याचे काम बहुतांशी पूर्ण होत आले आहे. पावसाळ्यापूर्वी लोखंडी जाळी व गॅबीयन वॉल हे दोन्ही काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी या आठवड्यापासून काही प्रमाणात यंत्रणा वाढविण्यात येणार आहे. – पंकज गोसावी, राष्ट्रीय महामार्ग विभाग.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:57 09-05-2025














