चिपळूणमधील वाशिष्ठी, शिवनदीतील गाळ उपशाची प्रांतांकडून पाहणी

चिपळूण : सध्या चिपळूणमध्ये सुरू असलेल्या वाशिष्ठी आणि शिवनदीच्या गाळ उपसा कामाची पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. गोवळकोट येथील सुवेज कालवा, गणपती विसर्जन घाट, पेठमाप, शिव नदी या ठिकाणी पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिल्या.

वाशिष्ठी आणि शिवनदीपात्रातून निघत असलेला गाळ नागरिकांनी मोफत न्यावा, असे आवाहन चिपळूण तहसील कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. या गाळासाठी चिपळूण तहसील कार्यालयात संपर्क साधून परवानगी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

शिव नदीमधील गाळ पुढे सरकवण्यासाठी डोजर मागवण्याची सूचना २०२१ च्या महापुरानंतर शिवनदी मधील गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशनच्या यंत्रणेने यशस्वीपणे पूर्ण केले. यावेळी गाळ काढण्यासाठी पोकलेन आणि नदीपात्रातील गाळ पुढे सरकवण्यासाठी यांत्रिकी विभागाचा डोजर वापरण्यात आला होता. यावेळी डोजर नसल्याने गाळ सरकवण्याचे काम पोकलेन करत आहे. पोकलेन द्वारे गाळ सरकवण्याच्च्या कामाला अधिक वेळ लागतो यासाठी लवकरात लवकर डोजर मागवण्याची मागणी चिपळूण बचाव समितीने केली.

दरम्यान, येत्या दोन महिन्यांमध्ये उपलब्ध यंत्रणेमधून जास्तीत जास्त गाळ काढण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांतर्फे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. या वेळापत्रकानुसार होणाऱ्या कामाची पाहणी चिपळूण बचाव समिती करणार आहे.

यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले, यांत्रिकी विभागाचे उपअभियंता विनय साळुंखे, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता विपुल खोत, चिपळूण बचाव समितीचे अरुण भोजने, बापू काणे, महेंद्र कासेकर, उदय ओतारी आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 10/May/2025