चिपळूण : शासकीय योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याची मागणी

चिपळूण : शासनाच्या अनेक योजना असून फक्त हुशार आणि कागदपत्रांचा अनुभव असलेलाच शेतकरी या योजनांचा लाभ घेतो. अनेक कष्टकरी शेतकरी मात्र माहितीच्या अभावामुळे या योजनांपासून वंचित राहातात. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी अशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यावर अधिक भर द्यावा, असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी खांदाटपाली येथे बोलताना केले.

तालुक्यातील खांदाटपाली ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये ७ मे रोजी शेतकरी मेळावा उत्साहात झाला. यावेळी आमदार शेखर निकम आणि मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना गाय, म्हशींसाठी कॅल्शियम पावडरचे वाटप करण्यात आले आ. निकम पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच जोडधंद्यांकडे वळून अधिकाधिक उत्पन्न मिळवायला हवे. चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी लागवडीबरोबरच शेतीची मशागत तितकीच महत्वाची आहे. बचत गटांतील महिलांना प्रशिक्षण मिळाल्यास उत्तमोत्तम काम करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे. आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग आपणच करायला हवे. लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आपल्या उत्पादनाचे फायदे व महत्व पटवून दिल्यास नक्कीच यश मिळेल, असा कानमंत्र आमदार निकम यांनी उपस्थित शेतकरी व बचत गटांच्या महिलांना दिला.

खांदाटपाली ग्रुप ग्रामपंचायतीने नावीन्यपूर्ण असा हा उपक्रम राबवल्यास शेतकरी आणि बचत गटांतील महिलांना पुढे काम करण्यासाठी एक नवी उर्जा मिळेल, असा अविश्वास व्यक्त केला, तसेच सीएसआर फंडातून असा उपक्रम राबवणारी ही पहिलीच ग्रामपंचायत असल्याचे सांगत सरपंच तन्वी बेडेकर, उपसरपंच सचिन गमरे यांच्यासह सदस्य व ग्रामस्थांचे आमदार निकम यांनी विशेष कौतुक केले. सर्व ग्रामपंचायतीनी असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून वैश्विक काम करायला हवे, असेही त्यांनी यावेळी नमुद केले.

खांदाटपली ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन गमरे यांनी रोजगाराच्या दृष्टीने शेतकरी आणि बचत गटांसाठी यापुढे देखील नवनवे उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे सांगत सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच गावातील विविध विकासकामांचा प्रस्ताव आ. शेखर निकम यांच्यापुढे मांडला. यावर उत्तर देताना आ. निकम यांनी सर्व विकासकामे करण्याची ग्वाही दिली. कृष्णा केमिकल कंपनी व पशु वैद्यकीय विभागाचे या मेळाव्यासाठी विशेष सहकार्य लाभले.

यावेळी सरपंच तन्वी रेडीज, उपसरपंच सचिन गमरे, जिल्हा परिषदेचे सर्व चिकित्सालय पशु वैद्यकीय सहाय्यक आयुक्त डॉ. कानसे, पशु वैद्यकीय अधिकारी बारपात्र, कृष्णा केमिकलचे सुयोग चव्हाण, व्यवस्थापक सौरभ लकेश्री, सदस्य सचिन बाईत, रिया मोहिते, श्रृती धाडवे, वैदेही नरळकर, डाटा ऑपरेटर तन्वी सुर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप नळकांडे, ग्रामसेवक स्वप्नाली चांद, तलाठी, आरोग्यसेवक अक्षय चव्हाण, अंगणवाडी सेविका, आशासेविका व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 12/May/2025