जलस्त्रोतांना दूषित आणि प्रदूषणापासून संरक्षण देण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणाची गरज : विजय सोळंखी

रत्नागिरी : जलस्त्रोतांना दूषित आणि प्रदूषणापासून संरक्षण देण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणाची गरज असून, हा उपक्रम पाणी टंचाई दूर करण्यासाठी आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक परिवर्तनकारी निर्णय असून, या माध्यमातून ग्रामीण समुदायांमध्ये सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी चालना देण्यात येत आहे,” असे प्रतिपादन वरिष्ठ भूवैज्ञानिक विजय सोळंखी यांनी येथे केले.

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील पाच प्रतिनीधींचे दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण व FTK द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ हॉटेल विवा एक्झिक्युटीव्ह रत्नागिरी आज (१३ मे) वरिष्ठ भूवैज्ञानिक विजय सोळंखी आणि रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चेतन शेळके यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी श्री. सोळखी पुढे म्हणाले, “सन २०१९ पासून जल जीवन मिशन कार्यक्रम हा केंद्र शासनाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम राबविला जात आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वैयक्तिक कार्यात्मक घरगुती नळ कनेक्शन (FHTC) द्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्याअनुषंगाने स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण हे प्रशिक्षण समुदाय संचलित दृष्टीकोनावर भर देत असून, ज्यामध्ये ग्रामपंचायती आणि ग्राम पाणी आणि स्वच्छता समितीमधील ५ प्रतिनिधींना भूजल शोध पद्धती तंत्रे, समुदाय संचलित भूजल व्यवस्थापन नियोजन, भूजल पुनर्भरणांची तंत्रे, भुपृष्ठावरील पाण्याच्या पुनर्भरण पद्धती, भूजल पुनर्भरणाच्या नदी, नाले तंत्रे या विषयावर तज्ञ मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन होणार आहे.”

या प्रशिक्षण कार्यक्रमाला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ठाकूर देसाई, आण्णासाहेब डांगे महाविद्यालयाचे (आष्टा, जि. सांगली) प्रा. पांडुरंग पिसाळ, गुणवंत महाजन, प्रा. अनिरुध्द पळणीकर, प्रवीण प्रशिक्षक म्हणून मंगेश नेवगे, वैष्णवी गुरव, श्रीम. हर्षदा वाळके हे मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मुख्य संसाधन केंद्र, जेपीएस फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले.

Tata motars

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 13/May/2025