गुहागर : वेळंब रोडवर बस- रिक्षाची धडक; 6 जण जखमी

गुहागर : तालुक्यातील वेळंब रोडवर एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रिक्षाचालकासह सहा जण जखमी झाले आहेत. रिक्षाचालक गितेश्वर खेडेकर यांच्यासह संतोष कृष्णा जाधव, राहुल पामु जाधव, सायली महेश तांबे, महेश मधुकर तांबे आणि आदिती महेश तांबे (सर्व रा. कोतळक बोऱ्याफाटा) अशी जखमीची नावे आहेत.

याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात एसटी बस चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ मे २०२५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गितेश्वर सुधीर खेडेकर (३९, रा. कोतळक बोऱ्याफाटा) हे त्यांच्या अँपे रिक्षा (एमएच-०८-एक्‍यू-३०३५) मधून प्रवासी घेऊन जात होते. वेळंब रोडवरील वळणावर काजळी-विठ्ठलवाडी जाणारी एसटी बस (एमएच-२०-बीएल-३६८६) उतारावरून वेगात आली आणि वळणावर चुकीच्या बाजूने येऊन तिने फिर्यादीच्या रिक्षाच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली.

फिर्यादी गितेश्वर खेडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एसटी बस चालक शंकर लक्ष्मण सोनावणे (वय ३८, रा. चिंचपाडा विठ्ठलवाडी, ता. कल्याण) याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. गुहागर पोलिसांनी आरोपी शंकर सोनावणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 14-05-2025