संगमेश्वर : मुचरी रस्त्याची दयनीय अवस्था

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील मुचरी गवळीवाडी ते कळंबस्ते फाटापर्यंतचा दोन किलोमीटरचा रस्ता हा पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. ४० वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते तेव्हापासून आजातागायत या रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. या रस्त्यावरून नियमित जांभा व अन्य अवजड वाहतूक नियमित होत असल्याने दिवसेंदिवस या रस्त्याची अवस्था बिकट होत चालली आहे.

मुचरी गवळीवाडीसह मोरेवाडी, सुर्वेवाडी, गोरेवाडी, बौद्धवाडी, तेरे टाकेवाडी येथील ग्रामस्थ या रस्त्याने नियमित ये-जा करत असतात तसेच वाहनांचीदेखील नेहमीच रेलचेल सुरू असते; परंतु रस्त्याची दुरवस्था झाल्याने येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण होण्यासाठी ग्रामस्थांनी या आधी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला; परंतु येथील ग्रामस्थांच्या वाट्याला केवळ निराशा आली आहे. आमदारांनी या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आश्वासन २०२३ मध्ये ग्रामस्थांना दिले होते; मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.

या रस्त्याविषयी आमदार शेखर निकम यांनाही निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार आमदारांनी हे काम मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती; परंतु आता काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने हे काम तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास पावसाळ्यात स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:57 PM 15/May/2025