दापोली सायक्लोथॉनमध्ये वयाची साठी ओलांडलेले रायडर्स

दापोली : वयाची साठी ओलांडलेले आणि अगदी ७७ वर वर्षे असलेले रायडर्सनी दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन स्पर्धा गाजवली. राज्यातील सुमारे ३०० स्पर्धक सहभागी झाले होते.

दापोली आसूद, सालदुरे, पाळंदे, आंजर्ले, अडखळ, पाजपंढरी, हर्णे, दापोली या समुद्रकिनाऱ्यावरील ५० किमी मार्गावर कोकणातील निसर्गसौंदर्य अनुभवत सर्वांनी सायकल चालवली. मार्गावर असलेल्या अनेक पर्यटन ठिकाणांना भेटी दिल्या. कोकणी खाद्यपदार्थ, मासे, आंबे, फणस, काजू, कोकणी रानमेवा इत्यादींचा आस्वाद घेतला. ही स्पर्धा ५० किमी कोस्टल सिनिक रूट, १५० किमी शॉर्ट सिटी लूप, फॅन राईड अशा अनेक गटांत झाली.

सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यामध्ये पुणे ते कन्याकुमारी सायकल राईड करत साजरा करणाऱ्या पुणे येथील ७८ वर्षीय डॉ. निरुपमा भावे सहभागी झाल्या होत्या. श्रीनगर, मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग करत जागतिक विक्रम प्रस्थापित करणारे सतीश जाधव (वय ६८), ७७ वर्षीय जुगल राठी, जगातील सर्वांत उंच उमलिंगला पास येथे सायकल चालवणारे डॉ. सुभाष कोकणे (वय ७३), जयश्री जाधव (वय ६२), राजू औटी (वय ६१), विजय हिंगे (वय ६५), हेमलता राव (वय ६६) असे सायकलिंग क्रीडा प्रकारात वय हद्दपार करणारे काही रायडर्स सहभागी झाले होते. या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पुणेहून डॉ. सुभाष कोकणे (वय ७३), विजय हिंगे (वय ६५), विद्याधर पालकर, मुंबई ठाणेहून अक्षय खांडेकर, नारायण पेरूमल, नयन पांचाळ, तौसिफ शेख, रवी यादव, महेंद्र निकम, विठोबा चव्हाण हे सायकल चालवत दापोलीत आले होते.

या सायक्लोथॉनसाठी दापोली शिक्षणसंस्था, दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज टीम, दापोली तालुका आरोग्य अधिकारी व टीम, दापोली पोलिस टीम, मेनेकी अब्सुलुट एनर्जी ड्रिंक, राहुल मंडलिक, हॉटेल ओमसाई इत्यादी अनेकांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेचे नियोजन करण्यात अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, राजेशकुमार कदम, रागिणी रिसबूड, राजेंद्र नाचरे, सुनील रिसबूड, विनय गोलांबडे, नितीन बर्वे इत्यादी अनेकांनी मोलाची भूमिका बजावली.

यांनी चालवली सायकल
शॉर्ट सिटी लूप मार्गावर अथर्व शेंडे, संतोष परब, स्वराज मांजरे यांनी १५०+ किमी, अनुज शिगवण, अथर्व मांडवकर, प्रेम भुसारे, सार्थक शिगवण यांनी १२५ किमी, परेश बुटाला, स्वराज राजपूरकर, आयुष शिंदे, मयुर देसाई, इत्यादींनी ८० किमी सायकल चालवली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 15/May/2025