रत्नागिरी : रत्नागिरीत ज्येष्ठ नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी रेशन कार्डाच्या १२ अंकी डिजिटलायझेशन प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेअभावी अनेक ज्येष्ठ नागरिक सरकारी योजनांच्या आर्थिक लाभापासून वंचित राहिले आहेत. यासाठी वारंवार तहसील कार्यालयात जाण्याची गरज पडू नये, यासाठी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेतला आहे. संघाने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून वस्तुस्थिती निदर्शनास आणली. त्यानंतर तहसीलदार कार्यालयाने ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
हा विशेष कॅम्प गुरुवार, दि. २२ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या शिवाजी नगर (नरहर वसाहत) येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कॅम्पमध्ये रेशन कार्डाचे १२ अंकी डिजिटलायझेशन केले जाणार आहे. रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना या कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ही सुविधा संघाच्या सभासदांसह इतर ज्येष्ठ नागरिकांसाठीही खुली आहे.
या कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात: रेशन कार्ड, रेशन कार्डवरील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, गॅस नोंदणी पुस्तक (पासबुक), उत्पन्नाचा दाखला (असल्यास) आणि कुटुंबातील दिव्यांग व्यक्तीचा दाखला (असल्यास). कागदपत्रांची पूर्तता केल्यास डिजिटलायझेशन प्रक्रिया सुलभ होईल, असे तहसीलदार कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
सुभाष थरवळ यांनी सांगितले की, या कॅम्पमुळे ज्येष्ठ नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज भासणार नाही. तसेच, डिजिटलायझेशनमुळे सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होईल. या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. तहसील कार्यालय आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या या संयुक्त प्रयत्नामुळे रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 19-05-2025













