कोकण विभागात दापोली तहसील कार्यालय प्रथम

दापोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये कोकण विभागातून दापोली तहसील कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

दापोली तहसीलदार कार्यालयाने सोयीसुविधा, वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन निवारण, स्वच्छता, तक्रार सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम जाहीर केली होती.

त्यामध्ये दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तहसील कार्यालयाच्या इमारतीची डागडुजी दुरुस्तीसह इमारतीला रंग, विजेचे फिटिंग, कर्मचाऱ्यांसाठी सुविधा तसेच नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, रेशनकार्ड एका दिवसात देणे, पोर्टल तक्रार निवारण केंद्र, लोकांना प्रत्येक सेवा देण्याचा प्रयत्न, वेगवेगळ्या सेवांचे बारकोड स्कॅनर बोर्ड तयार करून कार्यालयात लावणे, स्वच्छतागृहांची निगा राखणे आदी बाबीकडे लक्ष दिल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा दापोली तहसीलदार कार्यालयाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. शंभर दिवसांच्या सुधारणा मोहिमेचा दुसऱ्या टप्प्याचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये दापोली तहसील कार्यालयाचा कोकण विभागामध्ये प्रथम क्रमांक आला आहे

हा पुरस्कार सर्व महसूल कर्मचारी, तलाठी, सर्कल यांनी केलेल्या मेहनतीमुळे प्राप्त झाला असून जनतेनेही या मोहिमेला साथ दिली आहे. या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. यापुढे अजून जनताभिमुख प्रशासनाची मोहीम राबवून गोरगरिबांची सेवा केली जाईल- अर्चना बोंबे-घोलप, तहसीलदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 19/May/2025