रत्नागिरी, दि. १९ मे २०२५ : रत्नागिरी शहरातील जयस्तंभ परिसरात १७ मे २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका किरकोळ वादातून गंभीर घटना घडली. याप्रकरणी वेलनेस मेडिकलजवळ सचिन पांडुरंग वांयगणकर (वय ४९) यांच्यावर सिमेंट ब्लॉकने हल्ला करून दुखापत करण्यात आली. या प्रकरणी ओंकार इंदुलकर याच्याविरुद्ध रत्नागिरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन वांयगणकर हे ब्लड प्रेशरच्या गोळ्या खरेदी करण्यासाठी वेलनेस मेडिकल येथे गेले होते. त्या वेळी तिथे ओंकार इंदुलकर, पिंटू महाराणा आणि एका महिलेमध्ये जोरदार वाद सुरू होता. हा वाद पाहण्यासाठी स्थानिक रहिवासी विनय मसूरकर तिथे उभे होते. सचिन यांनी विनय यांना भांडण करणाऱ्या व्यक्तींबाबत विचारणा केली. याचा गैरसमज करून घेत ओंकार इंदुलकर याने सचिन यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढताच ओंकारने रस्त्याच्या कडेला पडलेला अर्धवट तुटलेला सिमेंट ब्लॉक उचलून सचिन यांच्या छातीवर जोरदार प्रहार केला. यात सचिन जखमी झाले.
या घटनेची तक्रार सचिन यांनी रत्नागिरी पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी १८ मे रोजी पहाटे ३:११ वाजता भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१) अंतर्गत गुन्हा क्रमांक २०५/२०२५ नोंदवला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 19-05-2025














