चिपळूण : वाशिष्ठीतील मातीच्या बांधामुळे तीन गावांची पाणी योजना अडचणीत

चिपळूण : शहरातील पेठमाप येथील वाशिष्ठी नदीपात्रात घातलेल्या मातीच्या बांधामुळे मिरजोळी, कोंढे, शिरळ गावच्या पाणी योजना अडचणीत सापडल्या आहेत. या गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यातच भरतीमुळे खाडीचे पाणी या भागात शिरून मचूळ, खारट आणि गढूळ पाणीपुरवठा नागरिकांना होत असल्याची तक्रार मिरजोळी ग्रामपंचायतीने प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे केली आहे. तेथील मातीचा बांध काही प्रमाणात काढून पूर्वीप्रमाणे पाण्याचा प्रवाह सुरू करावा, अशी मागणीही सरपंच कासम दलवाई यांनी केली आहे.

चिपळूण पालिका कार्यक्षेत्रात पेठमाप येथील वाशिष्ठी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कामाच्या वरील भागात मातीचा भराव टाकून वाशिष्ठी नदीपात्रातील एका बाजूकडील (मिरजोळी, कोंढे, शिरळ गावाकडे जाणारे नदीपात्र) पाण्याचा प्रवाह अडविण्यात आला आहे. त्यामुळे मिरजोळी, कोंढे, शिरळ नळ पाणीपुरवठा योजनांच्या जॅकवेलींना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही.

भरतीमुळे खाडीतील पाणी वरच्या भागात येत असल्यामुळे मचूळ, खारट, गढूळ पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे चिपळूण पेठमाप ठिकाणी वाशिष्ठी नदीपात्रात मातीचा भराव टाकून घातलेला बांध काही प्रमाणात काढून किंवा त्या ठिकाणी पाईप टाकून नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह चालू करावा. जेणेकरून वाशिष्ठी नदीपात्राजवळ मिरजोळी, कोंढे, शिरळ येथील नळपाणी योजनांना जॅकवेलवरून पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होईल, अशी मागणी सरपंच दलवाई यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 19/May/2025

Arihant 1