रत्नागिरीत नवे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वीकारला पदभार

रत्नागिरी, २४ मे २०२५ : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून माननीय श्री. नितीन बगाटे (आय.पी.एस.) यांनी आज रोजी पदभार स्वीकारला आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित एका औपचारिक समारंभात त्यांनी आपल्या नव्या जबाबदारीची सूत्रे हाती घेतली. या प्रसंगी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

नितीन बगाटे हे त्यांच्या दबंग आणि कर्तव्यनिष्ठ कामगिरीसाठी ओळखले जातात. हिंगोली जिल्ह्यातील निशाणा येथील एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या नितीन यांनी गरिबी आणि अडचणींवर मात करत यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. एकेकाळी हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर भाजी विकणाऱ्या या तरुणाने आज रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदापर्यंत मजल मारली आहे.

श्री. बगाटे यांनी यापूर्वी परभणी (२०१८-२०२०), चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग येथे आपल्या कार्यकुशलतेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. परभणीत प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक असताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे आणि खासदार संजय जाधव यांच्याशी झालेल्या वादामुळे ते चर्चेत आले होते. त्यानंतर सिंधुदुर्गात अपर पोलीस अधीक्षक आणि सप्टेंबर २०२३ पासून छत्रपती संभाजीनगरात पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली. त्यांच्या या अनुभवाच्या जोरावर आता रत्नागिरीत कायदा व सुव्यवस्था बळकट करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

जिल्हा प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी श्री. बगाटे यांचे स्वागत केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Tata altroz

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:57 24-05-2025