पहिली ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांची प्रतीक्षा

रत्नागिरी : लोकप्रतिनिधी बदललेले की, नियमही बदलतात. याआधी तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पहिली ते आठवीपर्यंत सर्व विषयांसाठी एकच पुस्तक असा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठीचा हा निर्णय महत्त्वपूर्ण होता. मात्र, आता शासनाने पूर्वीप्रमाणे सर्व विषयांची वेगवेगळी पुस्तके असा निर्णय घेतल्याने अजूनही पुस्तकांची छपाई सुरू आहे.

या विलंबामुळे बाजारात अद्याप पहिली ते आठवीपर्यंतची कोणत्याच माध्यमांची पुस्तके उपलब्ध नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

शासनाकडून अनुदानित पहिली ते आठवीपर्यंतच्या एक लाख ४ हजार १५६ विद्यार्थ्यांना ३ लाख ७८ हजार पुस्तकांच्या प्रति मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्यात येतात. मात्र, खासगी, विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके पालकांना विकत घ्यावी लागतात.

राज्य शासनाच्या सूचनेनुसार नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा दि. १६ जूनपासून सुरू होणार आहेत.

Radhakrushna patapedhi

मे महिना संपत आल्याने पालकांनी शैक्षणिक साहित्य खरेदी सुरू केली आहे. परंतु, बाजारात कोणत्याही विषयाची पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. अद्याप पुस्तकांची छपाई सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी सर्व विषयांसाठी एकच पुस्तक हा निर्णय घेण्यात आला होता. सर्व विषयासाठी एकच पुस्तक असल्यामुळे पुस्तकाची जाडी व वजन विद्यार्थ्यांना पेलणार नसल्यामुळे अभ्यासक्रम विभागून पुस्तकाचे चार सेट तयार करण्यात आले होते. घटक चाचणी, सहामाही परीक्षा, दुसरी घटक चाचणी, वार्षिक परीक्षेसाठीच्या नियोजित अभ्यासक्रमानुसार पुस्तक तयार करण्यात आले होते. परंतु, आता त्यातही बदल करत सर्व विषयाची स्वतंत्र पुस्तके तयार करण्यात आली आहेत. मात्र, अद्याप छपाईचे काम सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 28/May/2025