उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने ‘CM EGP’ योजनेत मोठे बदल: रत्नागिरीतील तरुणांना उद्योगाच्या नव्या संधी!

रत्नागिरी, २९ मे २०२५ : उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CM EGP) योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या सुधारणांमुळे आता युवकांना उद्योजक बनण्याची दुहेरी संधी आणि मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या योजनेत आता क्लाऊड किचन, जलक्रीडा, मासेमारी, प्रवासी वाहतुकीकरिता बोट व्यवसाय यांसारख्या अनेक नवीन पर्यटनपूरक आणि सेवा उद्योगांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध क्षेत्रांत आपले उद्योग सुरू करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाचा एक प्रमुख कार्यक्रम असून, राज्यातील युवकांना यशस्वी उद्योजक बनवण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

योजनेतील प्रमुख सुधारित तरतुदी (१ एप्रिल २०२५ पासून लागू):

समाविष्ट व्यवसाय : सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय, एकाच नाममुद्रेवर (ब्रँड) आधारित संघटित साखळी विक्री केंद्रे, फिरते विक्री केंद्र/खाद्यान्न केंद्र तसेच कुक्कुट पालन, अंडी उबवणी केंद्र, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, हॉटेल/ढाबा (शाकाहारी/मांसाहारी पदार्थ विक्री व्यवसाय), होम-स्टे, क्लाऊड किचन, जलक्रीडा, मासेमारी, प्रवासी वाहतुकीकरिता बोट व्यवसाय या योजनेअंतर्गत पात्र असतील.
वयोमर्यादा : कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय किमान १८ वर्ष पूर्ण झाले आहे, ते या योजनेसाठी पात्र असतील.
प्रकल्प किंमत : सेवा उद्योगांसाठी प्रकल्पाची किंमत ५० लाख रुपये आणि उत्पादन उद्योगांसाठी १ कोटी रुपये पर्यंत वाढवण्यात आली आहे.
खेळते भांडवल : सेवा उद्योगांसाठी खेळत्या भांडवलाची मर्यादा प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के आणि उत्पादन उद्योगांसाठी ४० टक्के असेल.
निवासी उद्योजकता प्रशिक्षण : कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर ऑनलाइन किंवा निवासी प्रशिक्षण घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : १० लाख रुपयांवरील उत्पादन प्रकल्पांसाठी आणि ५ लाख रुपयांवरील सेवा उद्योगांसाठी लाभार्थी किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक राहील.

Khabardar diwali fest

जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी, जिल्हा उद्योग केंद्र, औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) इमारत, जे. के. फाईल्स, बँक ऑफ इंडियाच्या शेजारी, रत्नागिरी (फोन नं. ०२३५२-२२२२५४, ई-मेल-didic.ratnagiri@maharashtra.gov.in) कार्यालयाशी संपर्क साधावा.